पुणे, ११/०३/२०२३: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.
ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, द्राक्षाच्या हंगामात सलग दुस-या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. हवामानातील बदलांमुळे तसेच बाजारभाव पडल्यामुळे द्राक्ष शेती सध्या संकटाच्या काळातून जात आहे. यंदाही त्याचा प्रत्यय शेतक-यांना येत आहेत. मात्र या संकटातून बाहेर पडण्याची जिद्द शेतक-यांनी बाळगली आहे. विघ्नहर्त्या गणेशाला यानिमित्त शेतक-यांच्या वतीने साकडे घालण्यात आले.
सुनील रासने म्हणाले, प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि क जीवनसत्त्वाचे चांगले स्त्रोत आहेत. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये भरपूर फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. हिरवी द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे.
More Stories
संरक्षण मंत्रालयाच्या पुणे येथील दक्षिण विभागाच्या जनसंपर्क अधिकारी पदी अंकुश चव्हाण यांची नियुक्ती
डेक्कन कॉलेज पद्व्युत्तर आणि संशोधन संस्था, अभिमत विद्यापीठ, पुणे येथे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम उत्साहात पार पडला.
वंचित मुलांसाठी हक्काचे घर निर्माण करून देणारे कावेरी व दीपक नागरगोजे यांची सामान्य ते असामान्य कार्यक्रमात होणार विशेष मुलाखत