May 3, 2024

पुणे: कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान जड वाहनांना प्रतिताशी ४० कि.मीची वेग मर्यादा

पुणे, दि. २१/०५/२०२३: कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान वारंवार होणार्‍या अपघातावर तोडगा काढण्यासाठी जड, अवजड वाहनांसाठी ४० कि.मी. प्रतितास वेगाची मर्यादा निश्चीत करण्यात आली आहे. त्यानुसार प्रायोगिक आता ट्रॅक्टर-ट्रेलर कॉम्बीनेशन ट्रक-ट्रेलर, अर्टीक्युलेटेड व्हेइकल्स, मल्टी अ‍ॅक्सल वाहनांसह कंटेनर मोठ्या आकाराची मालाची वाहतूक करणारे चालकांना वेगमर्यादेचे पालन करावे लागणार आहे. यासंदर्भात वाहतूक उपायुक्त विजयकुमार मगर यांनी आदेश जारी केला आहे.

 

मुंबई- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात नियंत्रणासाठी वाहतूक शाखा, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्यानुसार कात्रज बोगदा ते नवले पूल परिसरामध्ये पाहणी करुन अहवाल सादर केला. संबंधित परिसरातील अपघात रोखण्याकरीता विविध उपाययोजना समितीने सुचविल्या आहेत. नविन कात्रज बोगदा ते नवले पूल परिसरामध्ये घडलेले प्राणांतिक व गंभीर अपघात हे प्रामुख्याने अवजड वाहनांमुळे झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वेगमर्यादा निश्चीत करण्याचे धोरण ठरविण्यात आले.

 

अवजड वाहतूक करणारी वाहने घाटातून वेगात येत असताना ब्रेकिंग सिस्टीम योग्य प्रकारे प्रतिसाद न दिल्यामुळे ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महामार्गावर कात्रज बोगदा ते नवले पूल परिसरामध्ये अवजड वाहतूक करणार्‍या वाहनांकरीता ४० कि.मी. तास वेगमर्यादा निश्चित केली आहे. प्रायोगिक तत्वावर निर्णयाची अमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. याबाबतकाही सूचना असल्यास नागरिकांनी वाहतूक नियंत्रण शाखा येरवडा यांच्याकडे २६ मे पर्यंत लेखी स्वरुपात कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.