पुणे, 14/05/2026: पुणे महापालिकेने सुमारे साडे तिनशे कोटी रुपये खर्च करून संगमवाडी ते बंडगार्डन पूल या दरम्यान मुळामुठा नदीचा काठ सुशोभित करण्याचे काम सुरु केले. पण यामध्ये भूसंपादन न झाल्याने प्रकल्प रखडला आहे. हा भूसंपादनाचा तिढा सोडविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने तब्बल ५२ हजार ८५१ चौरस मिटर एवढी शासकीय जमीन विनामूल्य महापालिकेला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळणार आहे.
महसूल विभागाच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार संबंधित जमीन महसूलमुक्त आणि भोगवटा मूल्याशिवाय महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे प्रकल्पातील अडथळे दूर होऊन नदी सुधारणा, पूरनियंत्रण आणि हरित विकासाची कामे वेगाने मार्गी लागण्याची शक्यता आहे. मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत नदीची पूराचे पाणी वाहून देण्याची क्षमता वाढविणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी नदीत सोडणे, तसेच नदीकाठी हरित पट्टा आणि जॉगिंग ट्रॅक विकसित करणे अशी प्रमुख कामे करण्यात येणार आहेत.
शहराच्या पर्यावरणीय समतोलासोबतच नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. नदीकाठाचा शाश्वत विकास आणि पुणेकरांच्या जीवनमान उंचविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाचे महापौर मंजूषा नागपुरे यांनी स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आभार. हा निर्णय घेतल्याचे स्वतः बावनकुळे यांनी दूरध्वनीवरून सांगितले. हा निर्णय झाल्याने हा प्रकल्प वेगात पूर्ण होईल, नागपुरे यांनी सांगितले.
या जागा झाल्या उपलब्ध
नदीपात्रातील मळई जमीन – ११,०१५ चौरस मिटर
मुंढवा येथील बॉटेनिकल गार्डनची जमीन – ३४,१२८ चौरस मिटर
मुंढवा येथील महिला, बाल व सुधारगृहाची जमीन – ७,७०८ चौरस मिटर
नदी काठ सुधार मांजरी पर्यंत
संगमवाडी ते बंडगार्डन पूल आणि बंडगार्डन पूल ते मुंढवा पूल या दरम्यान सध्या नदी काठ सुधार प्रकल्पाचे काम सुरु आहे. पण पुणे शहराची हद्द मांजरीपर्यंत वाढल्याने आता या भागातील नदी काठ सुशोभित व्हावा असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर नगरसेवक दादा कोद्रे यांनी मांडला होता. त्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुंढवा पुलानंतरचा मुंढवा ते मांजरी बुद्रूक हा भाग झपाट्याने विकसित होत असून मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. त्यामुळे मुंढवा पूल ते मांजरी पर्यंतची नदी काठ सुधार करण्यास आज स्थायी समितीने मान्यता दिली.

More Stories
मुळशी पॅटर्न-२ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; युवा उद्योजक पुनीत बालन आणि अभिजीत भोसले यांची घोषणा
सारसबाग बंद ठेवण्यावरून पुन्हा वाद; गेल्या वर्षी धार्मिक कारण, यंदा सुरक्षेचा मुद्दा
Pune: एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशाचा पुन्हा समावेश व्हावा या मागणीसाठी भव्य मोर्चा