May 19, 2024

पुणे: मार्केट यार्ड गंगाधाम परिसरातील गोदामात आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात

पुणे, १८/०६/२०२३: मार्केट यार्ड-गंगाधाम रस्त्यावरील आईमाता मंदिर परिसरात असलेल्या एका गोदामात रविवारी आग लागली. आगीत गोदामातील साहित्य भस्मसात झाले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांमुळे गोदामाशेजारी लावलेल्या २५ ट्रक आगीची झळ पोहोचली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

गंगाधाम रस्त्यावरील आईमाता मंदिराजवळ गोदामे आहे. भागातील एका गोदामात रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १४ बंब आणि सहा टँकर घटनास्थळी दाखल झाले. या भागात गोदामे असल्याने आगीची झळ अन्य गोदामांना पोहोचण्याची शक्यता होती. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अग्निशमन दलाला तातडीने पाण्याचे दहा टँकर उपलब्ध करुन दिले. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या अग्निमशन दलाच्या दोन बंबांना पाचारण करण्यात आले. जवानांनी तातडीने गोदामातील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गोदामातील सिमेंट, मंडप साहित्य, कपडे, साबण, रंग, काच, रबर, वायर, तसेच अन्य साहित्य आगीत जळाले. जवानांनी चोहोबाजूंनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

गोदामाच्या शेजारी वस्ती आहे. या भागात आग पोहोचू नये म्हणून जवानांनी काळजी घेतली. वारे जास्त असल्याने आग पसरण्याची शक्यता होती. या भागात जवळपास १०० गोदामे आहेत. ज्या गोदामात आग लागली होती. त्या गोदामाच्या परिसरातील एका वाहतूकदाराने २५ ट्रक लावले हाेते. जवानांनी तातडीने ट्रक हलविल्याने ट्रकला आगीची झळ पोहोचली नाही. अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ अधिकारी आणि १०० जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.