July 22, 2024

पुणे: दहावीची बनावट प्रमाणपत्रे देणारी टोळी गजाआड, ३५ जणांना प्रमाणपत्रे दिल्याचे उघड

पुणे, ०३/०५/२०२३: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या ( एसएससी बोर्ड ) दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची बनावट प्रमाणपत्रे देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली. आरोपींनी ३५ जणांना बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. बनावट प्रमाणपत्रे देऊन फसवणूक प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.

या प्रकरणी संदीप ज्ञानदेव कांबळे (वय ३५, रा. सांगली), कृष्णा सोनाजी गिरी (वय ३४, रा. बिडकीन, जि. धाराशिव ), अल्ताफ महंमद शेख (वय ३८, रा. परांडा, जि . धाराशिव ), सय्यद इम्रान सय्यद इब्राहिम (वय ३८, रा. संभाजीनगर ) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत. या टोळीमध्ये अन्य काही आरोपी सामील असल्याचा संशय आहे. याबाबत एका तरुणाने पोलिसांच्या गुन्हे शाखेत तक्रार दिली आहे. त्याच्याकडून बनावट प्रमाणपत्रासाठी आरोपींनी साठ हजार रुपये उकळले. पोलिसांनी पाचवी अनुत्तीर्ण तरुणाला बनावट ग्राहक म्हणून पाठवून टोळीचा मुख्य सूत्रधार कांबळे याच्याशी संपर्क साधायला लावला.

त्यानंतर तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी एकापाठोपाठ चार संशयित आरोपीना अटक केली. आरोपींनी आतापर्यंत ३५ जणांना आतापर्यंत बनावट प्रमाणपत्रे दिली असल्याची माहिती निष्पन्न झाली आहे. पोलीस उपायुक्त अमाेल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शंकर पाटील, गजानन सोनवलकर, राहुल हाळेकर, भाऊसाहेब साडेमिसे, मुलाणी आदींनी ही कारवाई केली.