December 13, 2024

पुणे: कोथरुडमधील ज्येष्ठाला १४ लाखांचा गंडा

पुणे, २६/०२/२०२३: शेअर बाजारात ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाने दाखवून सायबर चोरट्याने कोथरुडमधील ज्येष्ठ नागरिकाला १४ लाख ५९ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये एका मोबाइल धारकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक पौड रस्ता भागात राहायला आहेत. त्यांच्या मोबाइलवर सायबर चोरट्याने संपर्क साधला होता. शेअर बाजारात (ऑनलाइन ट्रेडिंग) गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्याने त्यांना दाखविले होते. चोरट्याच्या आमिषाला ज्येष्ठ नागरिक बळी पडले.

त्यानंतर चोरट्याने त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी १४ लाख ५९ हजार रुपये घेतले. त्यांनी चोरट्याला सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे जमा केले. त्यानंतर त्यांना कोणताही परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे तपास करत आहेत.