July 22, 2024

पुणे: कारच्या धडकेने तीन वर्षाची चिमुरडी गंभीर जखमी

पुणे, ०६/०७/२०२३: वाघोली परिसरातील केसनंद रोड येथे जे.जे.नगर परिसरात एका इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीने त्याची स्विफ्ट गाडी कोणताही इशारा न करता ,पार्किंग मधून चालू करून काढत असताना तीन वर्षाच्या चिमूरडीस गाडीचा धक्का लागून, तिच्या उजव्या डोळ्यास आणि कानास गंभीर जखम झाल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी भागवत अशोकराव खवले (वय – 26 ,राहणार -पाथरी ,परभणी) याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनील हरिदास चव्हाण( वय -३०, राहणार – वाघोली ,पुणे )यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सुनील चव्हाण यांची तीन वर्षाची मुलगी केतकी ही घराजवळ खेळत होती. त्यावेळी आरोपीने त्याची गाडी कोणत्याही इशारा न करता ,पार्किंग मध्ये चालू करून बाहेर काढत असताना संबंधित कारचा मुलीला धक्का लागून तिच्या उजव्या डोळ्यास आणि कानास गंभीर जखम झालेली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस पुढील तपास करत आहे.

दुसऱ्या घटनेत, कोंढवा परिसरातील नगरसेवक नाना भानगिरे यांच्या निवासस्थानाच्या समोरील दुकानाच्या समोरून नुसताफ अली मोहम्मद अली शफी (वय – 54, राहणार -हडपसर ,पुणे )हे दुचाकी वर जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कार चालकाने त्याच्या ड्रायव्हर बाजूचा दरवाजा अचानक उघडल्याने ,तक्रारदार मुस्तफा शफी यांच्या दुचाकीला कारच्या दरवाजालची धडक बसून ते खाली रस्त्यावर पडले. या अपघातात त्यांच्या डाव्या पायाच्या पंजाची बोटे तसेच नडगीवर दोन फ्रॅक्चर होऊन उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी कारचालका विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

तर संगमवाडी येथून सादल बाबा चौकाकडे जात असलेला एक दुचाकी चालक स्वतः वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, वेगाने वाहन चालून घाईघाईने डीव्हाईडरला धडकला. या घटनेत स्वतः जखमी होऊन उपचारादरम्यान संचेती हॉस्पिटल मध्ये मयत झालेला आहे .प्रदीप भीमू चव्हाण (वय – २८, राहणार -कोथरूड ,पुणे )असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.