May 4, 2024

पुणे: कोरेगाव पार्क मध्ये नाइटक्लबवर कारवाई, राजकीय दबावापोटी एकावरील कारवाइ थांबवली

पुणे, ८ ऑक्टोबर २०२३: मुंढवा परिसरातील अनधिकृतरीत्या बांधकाम करण्यात आलेल्या काही पबवर महापालिकेने शुक्रवारी कारवाई केली असली, तरी एका बड्या राजकीय नेत्याच्या दबावापोटी ही कारवाई थांबवण्यात आली. त्यामुळे शेजारी-शेजारी असलेल्या एका पबवर कारवाई आणि दुसऱ्याला अभय असे चित्र निर्माण झाल्याने या कारवाईची चर्चा जोरदार रंगली आहे.

 

 

मुंढवा परिसरात नदीपात्रात राजरोसपणे सुरू असलेल्या पबवर महापालिकेने शुक्रवारी कारवाई प्रस्तावित केली होती. पोकलंड, जेसीबी आदी यंत्रसामग्रीसह महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी; तसेच पोलिसांचा फौजफाटा मुंढव्यात कारवाईसाठी पोहोचला होता. या वेळी महापालिकेने एका पबचे बांधकाम सुरू असताना तेथे कारवाईही केली. त्यात या पबचालकाला लाखो रुपयांना फटकाही बसला. मात्र, त्याच्याच शेजारी असलेल्या पबवर मात्र कारवाई झाली नाही. ही कारवाई रोखण्यासाठी राज्यातील ‘पॉवरफुल’ राजकीय नेत्याकडून दबाव आणण्यात आल्याची चर्चा आहे. ही कारवाई रोखली गेल्याने स्थानिकांकडून महापालिका प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर टीका करण्यात येत आहे.

 

महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत सुरू असलेले पब, रुफ टॉप हॉटेलवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील बेकायदा ‘रुफ टॉप हॉटेल’वर महानगरपालिकेने कारवाई केल्यानंतर काही दिवसांत ही हॉटेल पुन्हा सुरू केली जात आहेत. त्यामुळे ही हॉटेल महापालिकेच्या रडारवर आली आहेत. महापालिकेने यापूर्वी ९७ हॉटेलवर कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या बेकायदा हॉटेलविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे.

 

महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी नुकतीच बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात त्यांनी वाढत्या अनधिकृत बांधकामांविषयी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. ”रुफ टॉप हॉटेल’सह, साइड व फ्रंट मार्जिनमध्ये उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा आणि १५ दिवसांत अहवाल सादर करा,’ असे आदेश आयुक्तांनी बांधकाम विभागाच्या सर्व कनिष्ठ अभियंत्यांना दिले आहेत. त्यानुसार बांधकाम विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.