May 18, 2024

हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रोतर्फे स्टेशन गॅन्ट्री कामाला प्रारंभ बालेवाडी स्टेडियमवर पहिला ओव्हरहेड एल – गर्डर उचलण्यात आला

पुणे, दिनांक ६ ऑक्टोबर २०२३: हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाच्या कामाने शाश्वत वेग पकडला आहे. विविध टप्प्यांतील कामे निश्चित गतीने पुढे सरकत आहेत. यापैकी एक महत्वपूर्ण टप्पा आज (शुक्रवारी) सकाळी गाठण्यात आला. अत्याधुनिक स्टेशन एलिमेंट गॅन्ट्री (SLG1) यंत्रणेच्या सहाय्याने पहिला पूर्ण ओव्हरहेड ‘एल टाईप गर्डर’ यशस्वीरित्या उचलून बालेवाडी स्टेडियमसमोरील प्रस्तावित स्टेशन PMR १० येथे आज बसवण्यात आला. १९ मीटर लांबीचा हा गर्डर पुणे मेट्रो लाईन ३ च्या ताथवडे येथील कास्टिंग यार्डमध्ये बांधण्यात आला आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन ३ चे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ‘पीएमआरडीए’ तर्फे सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर टाटा समूहाने हाती घेतले असून त्याच्या कार्यान्वनासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे.

मेट्रोच्या बांधकाम प्रक्रियेमध्ये स्टेशन एलिमेंट गॅन्ट्री ही अतिशय महत्वपूर्ण यंत्रणा मानली जाते. अवजड गर्डर लीलया उचलणे आणि नियोजित जागेवर ते नेमकेपणाने बसवणे यासाठी ही अत्याधुनिक यंत्रणा उपयोगात आणली जाते. विशेषत: हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रोसारख्या पूर्णपणे ओव्हरहेड असलेल्या मेट्रोच्या कामात तर स्टेशन एलिमेंट गॅन्ट्रीचे महत्व आणखीनच जास्त असते.

“कोणत्याही मेट्रो प्रकल्पाच्या कामकाजात गर्डर हा एक महत्त्वाचा पैलू असतो; कारण ज्या मार्गिकेवर पुढे रूळ बसविले जाणार आहेत, किंवा स्टेशनची उभारणी होणार आहे त्या बांधकामाला बळकटी देण्याचे काम गर्डरद्वारे होते. पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्प शाश्वत गतीने प्रगती करत आहे. स्टेशन एलिमेंट गॅन्ट्रीद्वारे पहिल्या स्टेशन गर्डरच्या यशस्वी स्थापनेमुळे आम्ही हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आज टाकले आहे,” अशी माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आलोक कपूर यांनी दिली.

पुणे मेट्रो लाईन ३ बाबत माहिती:

पुणे मेट्रो लाईन ३ हा हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा २३ किमीचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प आहे, जो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) द्वारे टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (TUTPL) आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स (Siemens Project Ventures GmbH) यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमला प्रदान करण्यात आला आहे. हा प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनी द्वारे ३५ वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे.