May 12, 2024

पुणे: ज्वेलर्समध्ये सोने खरेदीसाठी गेलेल्या जेष्ठ महिलेचा ऐवज लंपास, रविवार पेठेतील घटना

पुणे, दि. २०/०८/२०२३: सोने खरेदीसाठी ज्वेलर्समध्ये गेलेल्या जेष्ठ महिलेच्या पर्समधील २४ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा १ लाख ८४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना १० ऑगस्टला दुपारी तीनच्या सुमारास रविवार पेठेतील ज्वेलर्समध्ये घडली आहे. याप्रकरणी ६४ वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला येरवडा परिसरात राहायला असून १० ऑगस्टला रविवार पेठेतील ज्वेलर्समध्ये सोने खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांची नजर चुकवून पर्समधील २४ हजारांची रोकड आणि दोन सोनसाखळ्या असा १ लाख ८४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. महिलेला काही वेळानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाउन तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. एन. पवार तपास करीत आहेत.