July 27, 2024

पुणे: सहायक अतिक्रमण विरोधी निरीक्षकाला बांबूने मारहाण, चौघांना अटक

पुणे, दि. २१/०३/२०२३: रस्त्यावर अनधिकृतपणे भाजीपाला आणि फळ विक्रेत्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या सहायक अतिक्रमण विरोधी निरीक्षकाला टोळक्याने बांबूने मारहाण केली. ही घटना १९ मार्चला संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास वारजेतील एनडीए रस्त्यानजीक घडली. याप्रकरणी चौघाजणांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे.

नवनाथ बाळासाहेब वांजळे (वय ३२, रा. वारजे) , रोहन मल्हारी माळशिखरे (वय १८, रा. शिवणे), सुभाष मारुती बोडके (वय ४० रा. शिवणे ) आणि गणेश गोरबा हुंबरे (वय ३० रा. बिबवेवाडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक अतिक्रमण विरोधी पथकातील निरीक्षकाने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुणे महानगरपालिकेत अतिक्रमण विरोधी पथकात सहायक निरीक्षक आहेत. १९ मार्चला ते पथकासह वारजेतील एनडीए रस्ता परिसरात कारवाई करण्यासाठी गेले होते. रस्त्यावर फळ विकणार्‍यांची कॅरेट बाजूला काढून कारवाई करीत असताना टोळक्याने त्यांना शिवीगाळ केली. हाताने आणि बांबूने मारहाण करीत त्यांना जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत काळे तपास करीत आहेत.