May 3, 2024

पुणे: ज्योतिषाकडून मुहूर्त काढून घरावर टाकला धाडसी दरोडा, एलसीबी पथकाकडून बारामतीतील दरोड्याची उकल

पुणे, दि. २१/०८/२०२३: ज्योतिषाकडून मुहूर्त काढून धाडसी दरोडा टाकणार्‍या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ६१ लाखांची रोकड आणि १५ लाखांचे दागिने असा ऐवज जप्त केला आहे. आरोपींनी चोरीतील ८ लाखांची रोकड ज्योतिषाला देणगी दिली असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आणखी तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, एपीआय नेताजी गंधारे, एपीआय राहूल गावडे उपस्थित होते.

सचिन अशोक जगधने (वय ३०, रा. गुणवडी बारामती) रायबा तानाजी चव्हाण (वय ३२, रा. शेटफळ हवेली, इंदापूर), रविंद्र शिवाजी भोसले, (वय २७, रा. निरा वागज, बारामती), दुर्योधन ऊर्फ दिपक ऊर्फ पप्पु धनाजी जाधव (वय ३५, रा. जिंती, ता. फलटण, सातारा), नितीन अर्जुन मोरे (वय ३६, रा. धर्मपुरी, ता. माळशीरस) ज्योतिषी रामचंद्र वामन चव्हाण (वय ४३,रा. आंदरूड ता. फलटण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सागर शिवाजी गोफणे यांनी तक्रार दिली आहे.

बारामतीतील देवकातेनगरमध्ये २१ एप्रिलला पाच दरोडेखोरांनी महिलेचे हातपाय बांधून दरोडा टाकून १ कोटींवर ऐवजाची चोरी केली होती. फिर्यादी सागर यांना जमिन व्यवहारातून मोठी रक्कम मिळाली होती. ते तिरूपति बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी पत्ना घरी एकटी असताना दरोडेखोरांनी गोफणे यांच्या घरावर दरोडा टाकला. महिलेचे हात पाय बांधून त्यांनी ९५ लाख ३० हजारांची रोकड आणि २० तोळे दागिने असा ऐवज चोरुन नेला होता. घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसानी तातडीने तपास पथकांची नियुक्ती करीत गुन्ह्याच्या उकलीसाठी प्राधान्य दिले. सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हे एमआयडीसीतील मजूर असल्याचे दिसून आले. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेउन पाचजणांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

फिर्यादी सागर यांच्याकडे भरपूर पैसे असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. त्यानुसार एमआयडीसीमध्ये काम करणार्‍या पाचजणांनी मिळून त्यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा डाव रचला. त्यासाठी त्यांनी ज्योतिषी रामचंद्र चव्हाण याची मदत घेतली. मात्र, पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागयी अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, एपीआय नेताजी गंधारे, राहुल गावडे, उपनिरीक्षक अभिजीत सावंत, उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, उपनिरीक्षक अमित सिद-पाटील, गणेश जगदाळे, रविराज कोकरे, बाळसाहेब कारंडे, नीलेश श्ािंदे, अक्षय नवले, प्रमोद नवले, राजू मोमीण, चंद्रकांत जाधव, सचिन घाडगे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, तुषार भोईटे, दगडू वीरकर, अक्षय सुपे यांनी केली.

दरोडा टाकण्यासाठी ज्योतिषाकडून काढला मुहूर्त: घरावर दरोडा टाकण्यासाठी आरोपींनी ज्योतिषाची मदत घेतली. त्याच्याकडून मुहूर्त काढून २१ एप्रिलला रात्री आठच्या सुमारास त्यांनी दरोडा टाकला. त्यानंतर चोरलेल्या ऐवजापैकी तब्बल ८ लाखांची रोकड ज्योतिषी रामचंद्र चव्हाण याला दिली. त्यानंतर बालाजी, शिर्डी येथे जाउन दर्शन घेत आरोपींनी दान धर्म केल्याचे तपासात उघड झाले आहे.

“जमिन व्यवहारातून मिळालेल्या पैशांची माहिती काढून आरोपींनी फिर्यादीच्या घरावर दरोडा टाकला. त्यासाठी त्यांनी ज्योतिषाकडून मुहूर्त काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींकडून रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ७६ लाखांवर ऐवज जप्त केला आहे.” – अंकित गोयल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण