पुणे, ५ मे २०२५: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत सर्वोत्तम मोबदला देण्याची हमी दिली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, केवळ जमीन न देण्याची भूमिका घेण्याऐवजी, अपेक्षित मोबदल्यासह आपापल्या मागण्या सात दिवसांत सरकारसमोर मांडाव्यात.
बावनकुळे म्हणाले की, सरकार कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय करणार नाही. हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असून, नागपूरच्या मिहान प्रकल्पाप्रमाणे हा भागही औद्योगिकदृष्ट्या विकसित होईल. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यावेळी शेतकऱ्यांवरील गुन्ह्यांबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, आंदोलनात निरपराध शेतकऱ्यांवर दाखल गुन्ह्यांची चौकशी करून ती मागे घेतली जातील. मात्र, अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.
पुरंदर तालुक्यातील सात गावांतील शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान बावनकुळेंनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी आमदार विजय शिवतारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. बावनकुळेंनी राज्यातील इतर विकास प्रकल्पांचे उदाहरण देत सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याचे लक्षात येताच, बावनकुळे यांनी सांगितले की, याची चौकशी होईल. काही लोकांनी आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हॉट्सअॅपद्वारे चुकीची माहिती पसरवून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भूसंपादनात दलालांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप फेटाळताना बावनकुळे म्हणाले की, असे काही प्रमाणात घडल्याचे दिसत नाही, मात्र या प्रकरणाची चौकशी केली जाईल. एक-दोन दलालांमुळे इतर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सध्या पुरंदर येथे सुरु असलेले सर्वेक्षण तात्पुरते थांबवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पुढील १५ दिवसांत संवाद साधून निर्णय घेतला जाईल, असेही महसूलमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
More Stories
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन
Pune: धनकवडी, औंध क्षेत्रात जोरदार अतिक्रमण कारवाई
Pune: संशोधक विद्यार्थ्यांची ही अवस्था तर बाकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच काय?