June 24, 2024

पुणे: अपघातानंतर मोटारीला आग; दैव बलवत्तर म्हणून मोटारचालक महिला बचावली

पुणे, १९/०४/२०२३: नगर रस्त्यावर येरवड्यातील आगाखान पॅलेससमोर भरधाव मोटारीने रस्त्यात थांबलेल्या डंपरला पाठीमागून धडक दिली. काही क्षणात मोटारीने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पेटलेल्या मोटारीतील महिला चालकाची सुखरुप सुटका केल्याने महिला बचावली.

नगर रस्त्याने भरधाव मोटार निघाली होती. आगाखान पॅलेससमोर रस्त्यावर थांबलेल्या डंपरला भरधाव मोटारीने पाठीमागून धडक दिली. काही क्षणात मोटारीच्या पुढील भागाने पेट घेतला. मोटारीत महिला असल्याचे शांतीबन साॅफ्टवेअर हब कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी मोटारीने पेट घेतल्याचे पाहिले. सुरक्षारक्षकांनी अग्निशमन यंत्रणा वापरुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती येरवड्यातील अग्निशमन दलाच्या केंद्राला कळविण्यात आली.
अग्निशमन दलाचे अधिकारी सोपान पवार, चालक सचिन वाघमारे,जवान सचिन जौंजाळे, संजय कारले, राहुल वडेकर, शरद दराडे, अक्षय केदारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी तातडीने मदतकार्य सुरु केले. मोटारीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली तसेच मोटारीत अडकलेल्या महिलेची सुखरुप सुटका करण्यात आली. शांतीबन साॅफ्टवेअर हब कंपनीतील सुरक्षारक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य केल्याने मोटारीतील महिला चालक बचावली.