June 14, 2024

पुणे: भाजपचे माजी नगरसेवक संजय घुले यांच्या विरुद्ध गुन्हा, जमीन खरेदी विक्री व्यवहारात महिलेची फसवणूक

पुणे, ३०/०३/२०२३: भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक संजय घुले यांच्यासह तिघांच्या विरुद्ध फसवणूक, अपहार केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संजय घुले (वय ५०), अनिकेत घुले (दोघे रा. महंमदवाडी, हडपसर), गणेश चौंधे (वय ५२) यांच्या विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणूक, अपहार करणे तसेच धमकावणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मधुरा रामदास गायकवाड (वय ४२, रा. महंमदवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. संजय घुले कौसरबाग-महंमदवाडी प्रभाग क्रमांक-२६ मधील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आहेत. घुले यांची महंमदवाडी परिसरातील सर्व्हे क्रमांक ७ येथे मोकळी जागा आहे. घुले यांनी या जागेतील अडीच गुंठे क्षेत्राची घुले गायकवाड यांना ५५ लाख रुपयात विक्री केली होती. जागा खरेदी व्यवहारात सुरुवातीला गायकवाड यांच्याकडून १२ लाख रुपये घेण्यात आले होते.

गायकवाड यांनी घुले यांच्याकडे खरेदीखताबाबत विचारणा केली होती. तेव्हा संबंधित जागेची दुसऱ्या एका व्यक्तीला विक्री केल्याची माहिती गायकवाड यांना समजली. त्यानंतर गायकवाड यांना घुले यांना विचारणा केली. तेव्हा घुले यांनी शिवीगाळ करुन धमकावले होते. या प्रकरणी घुले यांच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यासाठी गायकवाड यांनी न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने घुले यांच्यासह तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिले.