October 5, 2024

मुख्यमंत्र्यांचे खास बच्चू कडू महायुतीशी घेणार पंगा, शरद पवार यांची पुण्यात घेतली भेट

पुणे, १० आॅगस्ट २०२४: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासम खास असलेले व गुवाहाटी येथे देखील शिंदे यांच्या सोबत असणारे प्रहार अपंग क्रांती मोर्चाचे अध्यक्ष बच्चू कडू हे महायुतीसोबत पंगा घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या घडामोडी सुरू झालेले असताना आज बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शेतकरी, मजूर, अपंगांच्या भल्यासाठी आपण कोणासोबत जायचे याचा निर्णय घेऊ शकतो असे देखील ते म्हणाले.

शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना या शिंदे-फडणवीस सरकार मध्ये मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही. उलट महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे असलेले राज्यमंत्रीपद गमवावे लागले. त्यामुळे बच्चू कडू हे वारंवार महायुतीवर टीका करून घरचा आहेर देत असतात. त्यातच घडामोडी घडत असताना आज कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महायुती सरकारला वारंवार संधी देऊनही ते शेतकरी, दिव्यांग, मजुरांच्या प्रश्‍नांबाबत ठोस भूमिका घेतली नसल्याने कडू हे काही महिन्यांपासून महायुतीवर नाराज आहेत. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कडू यांनी महायुतीला धक्का देण्यास सुरवात केली आहे. कडू यांनी त्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला १ सप्टेंबरपर्यंतचा “अल्टिमेटम’ दिला आहे. तत्पूर्वी कडू यांनी शनिवारी अचानक शनिवारी पवार यांची त्यांच्या पुण्यातील मोदीबाग येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्याशी शेतकरी, दिव्यांग, मजुर यांच्या प्रश्‍नांसंदर्भात चर्चा केल्याचे कडू यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते.

“अपंग, शेतकरी, मजुरांच्या प्रश्‍नासंदर्भात आम्ही सरकारला निवेदन दिले आहे, त्याच मुद्यांवर शरद पवार यांच्याशीही चर्चा करत आहोत. आमच्यादृष्टीने ते मुद्दे महत्त्वाचे आहेत. ज्या पद्धतीने जातीधर्मावर राजकारण होते, त्याप्रमाणे दिव्यांग, शेतकरी, मजुर व अडचणीत असणाऱ्या लोकांच्या मुद्यांवरही चर्चा व्हायला पाहिजे. ते मुद्दे पक्षांच्या अजेंड्यावर आले पाहिजेत. कष्टकरी, पीडितांसाठी योजना पाहिजे, त्यासाठी सगळ्यांच्या भेटी घेत आहे. उद्धव ठाकरे यांनाही भेटू. युती सरकारला १ सप्टेंबरपर्यंत वेळ दिली आहे. १५ दिवसात लाडकी बहिण योजना येऊ शकते, तर 2 महिन्यात हे प्रश्‍न का सुटू शकत नाहीत ? ‘

महायुतीमधील नेत्यांवर कडू हे सातत्याने आरोप करत आहेत, याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, “मी कोणावरही आरोप केलेले नाहीत. १ सप्टेंबर पर्यंत आम्ही युती सरकारला वेळ दिला आहे. आमच्या मागण्यांबाबत बैठका, चर्चा होण्यासाठी ती वेळ दिलेली आहे. तोपर्यंत इतर पक्षही अपंग, शेतकरी, मजुरांच्या प्रश्‍नासंबंधीच्या मुद्यांवर सहमत होतात का, याविषयी आम्ही चर्चा करत आहोत. हे मुद्दे अजेंड्यावर येतील, त्यासाठी आमचा हा प्रयत्न सुरू आहे.’