October 5, 2024

पुण्यात रविवारी मनोज जरांगे-पाटीलांचे शक्तीप्रदर्शन

पुणे, १० आॅगस्ट २०२४ ः मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी (ता. ११) मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड मराठा समाज, पुणे जिल्हा यांच्यातर्फे आयोजित या रॅलीचा प्रारंभ सारसबाग येथून होणार असून डेक्कन येथील खंडूजी बाबा चौकात समारोप होईल.

‘अखंड मराठा समाज, पुणे जिल्हा’चे अंकुश राक्षे व बाळासाहेब अमराळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मनोज जरांगे-पाटील यांच्या गाड्यांचा ताफा कात्रजमार्गे सारसबाग येथे येणार आहे. सकाळी ११ वाजता सारसबागेतील गणपती मंदिरात दर्शन घेऊन आणि अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करून या रॅलीला प्रारंभ होईल. बाजीराव रस्ता, शनिवार वाडा या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास अभिवादन करून ही रॅली जंगली महाराज रस्त्याने पुढे जाईल. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन करून खंडूजी बाबा चौक येथे रॅलीची सांगता होईल.

रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. रॅलीमध्ये कोणत्याही वाहनास परवानगी नसेल. मनोज जरांगे-पाटील यांच्या गाडीच्या पुढे महिला आणि गाडीच्या मागे पुरुष असतील. या रॅलीत लाखो लोक सहभागी होण्याचा अंदाज असून रॅली यशस्वी होण्यासाठी दोनशे स्वयंसेवक काम करत आहेत. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी आणि खाद्यपदार्थांचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती राक्षे यांनी दिली.