May 16, 2024

पुणे: कॉलेजची खुन्नस जीव घेण्यापर्यंत पोहोचली, खेडमधील इंजिनिअरच्या खुनाचा उलगडा

पुणे, दि. १०/०८/२०२३: कॉलेजमध्ये एकमेकांकडे बघण्यातून सुरू झालेला वाद अखेर जीव घेण्यापर्यंत पोहाचला. त्याच खुन्नसमुळे इंजिनिअर तरुणाच्या डोक्यात दगड मारून आणि चाकूने वार करून खून केल्याचे उघडकीस आले आहे. खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांडभोरवाडी गावच्या हद्दीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवून खूनाची उकल करण्यात खेड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आले आहे.

मयुर संदीप दळवी (रा. सराफबाजार, कोपरगाव, ता. कोपरगाव, नगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सौरभ नंदालाल पाटील (वय २३ रा. सुरभ साई पंढरीनगर, पिंपळवाडी रोड शिर्डी ता. राहाता जि. नगर) असे खून झालेल्या इंजिनिअर तरुणाचे नाव आहे.

सांडभोरवाडी गावच्या हद्दीत तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. तपासादरम्यान संबंधित तरुण सौरभ पाटील हा नगर जिल्ह्यातील शिर्डीचा असल्याचे उघडकीस आले. तो २८ जुलै रोजी बेपत्ता झाला होता. तो हिंजवडीतील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करत होता. गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेडचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना दिल्या होत्या. तपासासाठी दोन विशेष पथके तयार करून गुन्हयाचा माग काढण्यात येत होता. आरोपीने कोणताही पुरावा मागे ने ठेवता रात्रीचे वेळी निर्जन ठिकाणी खून केल्यामुळे पोलिसांना सुगावा लागत नव्हता.

तपास पथकांनी माहिती काढली असता सौरभ पाटील याची काही महिन्यापुर्वी मयुर दळवा याच्यासोबत भांडणे झाल्याचे उघडकीस आले. त्यानुसार नगर पोलिसांनी मयुरला ताब्यात घेउन पुणे एलसीबीच्या स्वाधीन केले. चौकशीत सौरभ पाटील व मयुर दळवी हे कोपरगावतील संजिवनी कॉलेजमध्ये शिकत असताना खुन्नसने पाहील्यावरून भांडण झाल्याचे सांगितले. त्यानंतर काही महिन्यापुर्वी दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले होते. त्याच रागातून आरोपीने सौरभला गाठून त्याच्यावर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. त्याच्या डोक्यात दगड मारून मृतदेह निर्जनस्थळी टाकून पसार झाल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर अधिक्षक मितेश घट्टे , उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, एपीआय अभिजीत सावंत, राजु मोमीन, अतुल डेरे, प्रकाश वाघमारे, दिपक साबळे, विक्रम तापकीर, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर शंकर भवारी, संतोष मोरे, प्रविण गेंगजे, स्वप्नील लोहार, सागर शिंगाडे, योगेश भंडारे, सुनिल बांडे यांनी केली.

“महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एकमेकांकडे बघण्यातून दोघांचे वादविवाद सुरु झाले होते. त्यानंतर काही महिन्यांपुर्वी त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्याच रागातून आरोपीने इंजिनिअरचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरु आहे.” – सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड