May 20, 2024

आयटीएफ मास्टर्स जागतिक टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नितीन किर्तनेची ऐतिहासिक कामगिरी

पुणे, 13 मे 2024: मेक्सिको येथे पार पडलेल्या आयटीएफ मास्टर्स जागतिक टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत जगदीश तन्वर, अजित सैल आणि हतींदर पन्वर, नितीन किर्तने या भारतीय संघाने सांघिक गटात भारताच्या इतिहासात प्रथमच रजतपदकांची कमाई करत ऐतिहासिक कामगिरी केली.

मेक्सिको येथे उष्ण खडतर अशा वातावरणामुळे अनेक खेळाडू आजारी पडले होते. हि सांघिक गटातील स्पर्धा 27 एप्रिल ते 3 मे 2024 या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत 26 संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. सांघिक स्पर्धेत भारतीय संघाने कॅनडा, फ्रान्स, टर्की या संघांचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटन संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत स्लोव्हाकियाच्या बार्बरा मुलेज व नेदरलँडच्या बार्ट बेक्स यांनी ऑस्ट्रेलियाच्या इसाबेली गेमल व भारताच्या नितीन किर्तने यांचा 6-1, 7-5 असा पराभव केला. भारताच्या इतिहासात प्रथमच सांघिक गटात भारतीय संघाने अशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

4 ते 13 मे या कालावधीत पार पडलेल्या वैयक्तिक स्पर्धेत नितीन किर्तने याने उत्कृष्ट कामगिरी करत रजत व कांस्य पदकाची कमाई केली. यामध्ये 50 वर्षांवरील एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत नितीन किर्तनेला अव्वल मानांकित नेदरलँडच्या बार्ट बेक्सकडून 5-7, 6-7(5) असा पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय दुहेरीत उपांत्य फेरीच्या लढतीत बार्ट बेक्स व सेबॅस्टियन जॅक्सन यांनी नितीन किर्तने व जगदीश तन्वर सुपरटायब्रेकमध्ये 6-2, 2-6, [10-6] असे पराभूत केले.

यावेळी नितीन किर्तने म्हणाला की, वैयक्तिक गटात मी खूप चुरशीने लढत दिली, पण दुहेरीतील लढतींमुळे शारीरिकदृष्टया मी थकलो होतो. तीनही लढतीमध्ये मी बार्टविरुद्ध कडवी झुंज दिली. सांघिक गटात जगदीश तन्वर, अजित सैल आणि हतींदर पन्वर यांचा मिळालेल्या पाठिंब्यामुळे मी त्याचा आभारी आहे. तसेच, माझ्या कुटूंबियांनी वेळोवेळी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांचादेखील मी आभारी आहे. अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए) आणि स्टॅगचे राकेश कोहली यांनी दिलेल्या सहकार्यामुळे त्यांचेदेखील मी आभार मानतो. एआयटीए आणि स्पोर्ट्स मिनिस्ट्री यांनी आम्हांला पुढील वर्षी पुन्हा एकदा संधी दिल्यास आम्ही आणखी कसोशीने प्रयत्न करू.

निकाल: 50 वर्षांवरील एकेरी गट(उपांत्यपूर्व फेरी):
बार्ट बेक्स(नेदरलँड)वि.वि.नितीन किर्तने(भारत)7-5, 7-6(5).
50 वर्षांवरील दुहेरी: उपांत्य फेरी: बार्ट बेक्स(नेदरलँड)/सेबॅस्टियन जॅक्सन(ग्रेट ब्रिटन) वि.वि.नितीन किर्तने(भारत)/जगदीश तन्वर(भारत)6-2, 2-6, [10-6];
मिश्र दुहेरी(अंतिम फेरी): बार्बरा मुलेज(स्लोव्हाकिया)/बार्ट बेक्स(नेदरलँड) वि.वि.इसाबेली गेमल(ऑस्ट्रेलिया)/नितीन किर्तने)(भारत)6-1, 7-5.