December 13, 2024

पुणे: रुबी हॉल क्लिनिक मध्ये किडनी रॅकेट चौकशीसाठी समिती स्थापन

मुंबई, दि. १७/०३/२०२३: रुबी हॉल क्लिनिक मध्ये किडनी रॅकेटची  चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समिती नेमून तीन महिन्यात याबाबत अहवाल सादर करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली.

याबाबत भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. या रॅकेट मधील मुख्य आरोपी फरारी आहे. ही  संघटित गुन्हेगारी असून, या रॅकेटचे लोन महाराष्ट्रात पसरल्याचे मिसाळ यांनी निदर्शनास आणले.

धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत रुग्णालयांमध्ये मोफत किंवा पन्नास टक्के सवलतीच्या दरात गरीब आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची अनियमितता तपासण्यासाठी लेखा परीक्षकांच्या मार्फत परीक्षण करून अनियमितता आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केली.