September 10, 2024

पुणे: गुंतवणुकीच्या आमिषाने संगणक अभियंत्याची ५० लाखांची फसवणूक

पुणे, ०४/०६/२०२३: गुंतवणुकीवर परतावा देण्याच्या आमिषाने संगणक अभियंत्याची ५० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी गिरीश विजय काेल्हे (रा. आयव्हीआय अपार्टमेंट, वाघोली) याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका संगणक अभियंत्याने फिर्याद दिली आहे. तक्रारदार संगणक अभियंता वडगाव शेरी भागात राहायला आहे. आरोपी कोल्हे याने खासगी वित्तीय संस्था सुरू केली होती. गुंतवणुकीवर परतावा देण्याच्या आमिषाने त्याने अनेकांकडून पैसे घेतले हाेते. फिर्यादी संगणक अभियंत्याची मित्रामार्फत आरोपी कोल्हे याच्याशी ओळख झाली होती. वित्तीय संस्थेत पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष कोल्हे याने दाखविले होते.

तक्रारदार संगणक अभियंत्याने वेळोवेळी ५९ लाख ६० हजार रुपये आरोपी कोल्हे याला दिले हाेते. ९ लाख रुपये कोल्हे याने तक्रारदार संगणक अभियंत्याला परत दिले होते. मात्र, त्यानंतर आरोपी पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. तक्रारदाराला परतावाही दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संगणक अभियंत्याने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.