November 5, 2025

पुणे: सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलानंतरही कोंडी कायम; अधिकाऱ्यांनीच घेतली रस्त्याची पाहणी

पुणे, ३ मे २०२५ : सिंहगड रस्त्यावर कोट्यवधींचा उड्डाणपूल उभा राहिला, पण वाहतूक कोंडी मात्र तितकीच कायम! नागरिकांचा संताप वाढू लागल्यावर अखेर आज अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि पुणे महापालिकेचे अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरले आणि कोंडीचे मूळ शोधण्यास सुरुवात केली.

विठ्ठलवाडी ते फनटाईम थिएटरदरम्यानच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन १ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. मात्र, दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी वडगाव येथील वीर बाजी पासलकर चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली. पुलावर केवळ तीन मिनिटांचा प्रवास अर्धा तास लांबला आणि नागरिक त्रस्त झाले.

आज सकाळी अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संदीप पाटील आणि इतर अधिकाऱ्यांनी राजाराम पुलापासून पासलकर पुलापर्यंत रस्त्याची पाहणी केली. फनटाईम ते वडगाव पूल दरम्यानच्या अरुंद रस्त्यांवर, अतिक्रमणांवर, अयोग्य पार्किंगवर आणि गतिरोधकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

“सिंहगड रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिका व पोलिस विभागाला आवश्यक ती सर्व सुधारणा त्वरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.” – मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त