November 2, 2024

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली

पुणे, १४/०४/२०२३: डॉ. आंबेडकर यांचे विचार समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचवण्यासाठी तसेच सामाजिक एकता आणि समानतेचा संदेश देणार्‍या मॅरेथॉनच्या धर्तीवर आधारित  भिमथॉन स्पर्धेतील पुरुष गटात पहिला येण्याचा मान विकास पोळ यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक दीपक कुंभार व तृतिय क्रमांक इमताज मोनदल यांना मिळाला. १८ वर्षाखालील गटात संदीप यादव, प्रताप कदम आणि आदित्य पायाळ विजयी ठरले. महिला खुल्या गटात रोहिणी टिळक, रुषिका कुळे व अर्पिता शिंदे विजयी ठरल्या. १८ वर्षाखालील युवती गटात निशा पासवान, देवकी आणि रिया धावरे यांनी विजयाचा मान पटकावला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमथॉन स्पर्धेचे आयोजन स्पार्क फौंडेशनचे किशोर कंबळे, माय अर्थ फाउंडेशचे अध्यक्ष अनंत घरत यांनी केले. ७ किलोमीटर अंतर असलेली ही स्पर्धा सारसबाग जवळील सणस मैदानापासून सुरु होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन येथे समारोप झाला. महिला, पुरुष व १८ वर्षाखालील युवा गटात लढत झाली. मोठ्या संख्येने नागरिकांनी या स्पर्धेत भाग घेतला व मॅरेथॉन ची शोभा वाढवली. विजेत्यांना ट्रॉफी सर्टिफिकेट व मेडल देण्यात आले व सर्व स्पर्धकांना सर्टिफिकेट आणि मेडल देण्यात आले.

या मॅरेथॉनला पुणे जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर सूत्रसंचालन ऍड. आकाश साबळे यांनी केले.