September 23, 2025

पुणे: बोपोडी चौक ते चर्च चौक दरम्यान हलक्या वाहनांसाठी दुहेरी वाहतूक

पुणे, ०१/०९/२०२३: मेट्रोच्या कामामुळे जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी चौक ते चर्च चौक दरम्यान एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. या भागातील मेट्रोचे काम पूर्ण होत आले असून, बोपोडी चौक ते चर्च चौक दरम्यान हलक्या वाहनांसाठी पुन्हा दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

मेट्रोच्या कामामुळे बोपोडी चौक ते चर्च चौक दरम्यान मेट्रोचे काम सुरू होते. त्यामुळे या भागातील वाहतूक खडकी बाजारमार्गे वळविण्यात आली होती. खडकी बाजार परिसरात वाहतूक कोंडी होती. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मेट्रोचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आले आहे. त्यामुळे बोपोडी चौक ते चर्च चौक दरम्यान रस्ता दुचाकी, तीनचाकी, मोटारींसाठी खुला करण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर १ ते १५ सप्टेंबर दरम्यान वाहतूक बदल करण्यात आले आहे. या भागातील वाहतूक विचारात घेऊन वाहतूक बदलाबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.

खडकी बाजार येथून पिंपरीकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी फुटबाॅल मैदान चौकातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त पवार यांनी केले आहे.