April 28, 2024

नगर जिल्ह्यातील दारुकांड प्रकरणातील फरार महिला पुण्यातून अटकेत – राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

पुणे, ०१/०९/२०२३: नगर जिल्ह्यातील पांगरमल दारुकांड प्रकरणात फरार महिलेस राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) पुण्यातून अटक केली. पांगरमल गावातील पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या महिला उमेदवाराने आयाेजित करण्यात आलेल्या पार्टीत दारु पिल्याने नऊजणांचे बळी गेले होते. विषारी दारुकांड प्रकरणात १३ जणांची प्रकृती गंभीर होती. त्यापैकी एकास अर्धांगवायूचा झटका आला होता आणि एकाला अंधत्व आले होते.

भाग्यश्री गोविंद मोकाटे (रा. इमामपूर, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मोकाटे आणि मंगला महादेव आव्हाड या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांनी १२ फेब्रुवारी २०१७ रोजी पार्टी आयोजित केली होती. निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी मोकाटे आणि आव्हाड यांनी पांगरमल गावात पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत विषारी दारु पिल्याने नऊजणांचा मृत्यू झाला होता. १३ जणांना त्रास झाला होता. अत्यवस्थ झालेल्या १३ जणांपैकी एकास अर्धांगवायूचा झटका आला होता. एकाला अंधत्व आले होते. याप्रकरणात १९ आरोपींविरुद्ध अहमदमनगरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. निवडणुकीत आरोपी मोकाटे विजयी झाली होती. गेले सहा वर्ष ती फरार होती.

न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता. विशेष न्यायालयाने तिला वाँरंट बजावले होते. याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला होता. ती पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोकाटेला पकडले. सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, विशेष महानिरीक्षक संजय येनपुरे, पोलीस अधीक्षक पल्लवी बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद रावडे, हवालदार विकास कोळी, सुनील बनसोडे, उज्वला डिंबळे, कदम आदींनी ही कारवाई केली.