October 3, 2024

पुणे: पत्नीसह मुलाचा खून करीत अभियंत्याने केली आत्महत्या, औंधमधील डीपी रस्त्यावरील घटना

पुणे, दि. १५/०३/२०२३:  पत्नीसह मुलाचा खून करीत नामांकित आयटी कंपनीत काम करीत असलेल्या अभियंत्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास औंधमध्ये उघडकीस आली. संबंधित घटनेचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी चतुःशृंगी  पोलिसांनी घटनेची नोंद करीत तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससुन रुग्णालयात दाखल केले आहेत.

तनिष्क सुदिप्तो गांगुली (वय ८), प्रियंका सुदिप्तो गांगुली (वय ४०) अशी खून केलेल्यांची नावे आहेत. सुदिप्तो गांगुली (वय ४६, सर्व रा. औंध मूळ-पश्चिम बंगाल) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांगुली कुटूबिंय मूळचे पश्चिम बंगालमधील असून नोकरीमुळे मागील १८ वर्षांपासून पुण्यातील औंधमध्ये राहायला होते. दरम्यान,  मंगळवारी गांगुली कुटूंबियाची मिसिंग तक्रार चतुःशृंगी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिस तपास करीत होते.  मिसिंग तक्रारीचा शोध घेत असताना बुधवारी दुपारी  चतुःशृंगी पोलिस मोबाइल लोकेशननुसार औंध परिसरात गेले. त्यावेळी खून आणि आत्महत्येची घटना उघडकीस आली. दरम्यान,  सुदिप्तो हिंजवडीतील टीसीएस या नामांकित कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. पत्नी प्रियंका गृहिणी तर मुलगा दुसरीत शिक्षण घेत होता.

पोलिसांनी औंध परिसरातील गांगुली यांच्या घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता, प्रियंका आणि तनिष्क यांच्या गळ्याला प्लॅस्टिक पिशवीने आवळून त्यांचा खून केल्याचे दिसून आले.सुदिप्तोने गळफास घेउन आत्महत्या केल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तिघांचेही मृतदेह ससुन रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी वरिष्ठ अधिकार्‍यांनी धाव घेतली होती. दरम्यान, सुदिप्तोने पत्नी आणि मुलाचा खून करीत आत्महत्या का केली, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.