May 16, 2024

पुणे: परदेशी विद्यार्थ्यांनी घेतला वारली चित्रकलेचा आस्वाद

पुणे, ११/०८/२०२३: परदेशी विद्यार्थ्यांसाठी आय.सी.सी.आर, बी.एम्.सी.सी, ऑटोनोमस पुणे आणि संस्कार भारती पिंपरी चिंचवड यांनी संयुक्तपणे शुक्रवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी वारली चित्रकलेच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. भारताच्या विविध लोककलां मधील महाराष्ट्राच्या वारली चित्रकलेची ओळख परदेशी विद्यार्थ्यांना व्हावी हा यामागील उद्देश होता. वारली चित्रकलेचे मुळ,ती कशी, कुठे, केव्हा साकारली जाते, तिची वैशिष्ट्ये परराष्ट्रीय आणि भारतीय विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाली.

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालया अंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालय (आय.सी.सी.आर), बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, ऑटोनोमस पुणे आणि संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती तर्फे आयोजित कार्यक्रमात चित्रकार सौ. मुग्धा शिरोडकर , कु. विराज गुपचूप, यांनी वारली चित्रकला यावर अभ्यासपूर्ण विवेचन करून त्यांना ती कशी साकरावी हे विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः वारली चित्रे सरावासाठी व साकारण्यासाठी सांगितले. यात सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला व तासाभरात ५० पेक्षा जास्त जणांनी वारली चित्रकला आपापल्या दृष्टीकोनातून साकारली. यासाठी संस्कार भारती च्या प्राज्ञिक, ऋषी , ऋतू, निकिता, सृष्टी यांनी सहकार्य केले. कार्यक्रम बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स ऑटोनोमस पुणे येथील टाटा सेमिनार हॉल मध्ये झाला.

आय.सी.सी.आर.चे विभागीय निदेशक राज कुमार, बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स ऑटोनोमस पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीचे उपाध्यक्ष श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर, सुप्रसिद्ध चित्रकार सौ. भारतीताई माटे, बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स ऑटोनोमस पुणे च्या हेरिटेज कॉलेक्टिव चे सौ. राजश्री गोखले आय.सी.सी.आर.चे सल्लागार डॉ. प्रशांत साठे, सौ. लीना आढाव, सौ. कल्याणी सालेकर, कार्यक्रम अधिकारी संजीवनी स्वामी उपस्थित होते.

परदेशी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांमधून सर्वोत्कृष्ट चित्रांना बक्षीस देऊन त्यांना गौरविण्यात आले रमेश चकमा, बिस्ती बरुआ, रहमतुल्ला मोमंद, मुनिरा , सादिया आफरीन मौमी, नईमा सुलताना, तसेच कु. ऋतूजा गायकवाड, जागृती बजाज या भारतीय विद्यार्थ्यांना ही गौरवण्यात आले. या प्रसंगी सौ. भारतीताई माटे यांनी कला जोपासण्या बदल मार्गदर्शन केले. आय.सी.सी.आर.चे विभागीय निर्देशक राज कुमार यांनी आय.सी.सी.आर.च्या उपक्रमांची माहिती देऊन कलाकार, प्राचार्य आणि इतर मान्यवरांचा सन्मान केला. या संयुक्त उपक्रमांद्वारे देश-विदेशातील विद्यार्थ्यांना माहितीसह लोककलेचा आस्वाद घेता आला, असे मत प्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन कु. विलिना आणि कु. अदिती यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स ऑटोनोमस पुणे चे हेरीटेज कॉलेक्टीव विद्यार्थ्यांनी विषेश सहाय्य केले