May 2, 2024

पुणे: इझी पे कंपनीची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक, आणखी एका आरोपीला अटक, पुणे सायबर पोलिसांची कामगिरी

पुणे, दि. २४/०७/२०२३: ऑनलाइन आर्थिक सेवा देणाऱ्या इझी पे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या देशभरातील ६५ प्रतिनिधींनी साडेतीन कोटी रुपयांची फसणूक केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी एकाला पश्चिम बंगालमधून अटक केली होती. त्यानंतर आणखी एका आरोपीला अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. संबंधित आरोपीला शिवाजीनगर परिसरातुन अटक केली आहे.

छोटू उर्फ एजाज आलम जीवाउल अन्सारी वय २८ रा. बिहार असे अटक केलेल्याचे नाव आहे. यापुर्वी पोलिसांनी
अंकितकुमार अशोक पांडे (वय २०, रा. नवादा, बिहार) याला अटक केली आहे.

इझी पे कंपनीचे येरवडा भागात कार्यालय असून कंपनीकडून ऑनलाइन पेमेंट सुविधा दिली जाते. कंपनीने देशभरात अधिकृत प्रतिनिधींची (एजंट) नियुक्ती केली आहे. दरम्यान, कंपनीत कामाला असताना ६५ प्रतिनिधींनी संगनमत केले होते. कंपनीची ३ कोटी ५२ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली होती. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडून शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. तांत्रिक तपासात आरोपी पांडे दिल्लीत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

दरम्यान, फसवणूक प्रकरणातील दुसरा आरोपी छोटू हा शिवाजीनगर तोफखाना परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त अप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, उपनिरीक्षक तुषार भोसले, राजकुमार जाबा, निलेश लांडगे, शाहरूख शेख, किरण जमदाडे, बाबासाहेब कराळे, आनंदराव भंडलकर यांनी केली.