October 5, 2024

पुणे: गणेशोत्सव मंडप, कमानीसाठी एक खिडकी योजना

पुणे, २१ ऑगस्ट २०२४: पुणे महापालिकेने २०१९ मध्ये गणेशोत्सवाचा मंडप, स्वागत कमानी, रनिंग मंडप यांना परवानगी दिलेली आहे. ही परवानगी पाच वर्षाच्या कालावधीसाठी ग्राहय धरली जाणार आहे. त्यामुळे परवानाधारकांना नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. ज्या गणेश मंडळाना परवानगी घ्यायची आहे. त्याच्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये पुणे महापालिका आणि पोलिस यांच्या संयुक्त उपक्रमातुन एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे. गणेश मंडळांनी २०१९ची कार्यपद्धतीचा अवलंब करून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी कोणतेही परवाना शुल्क आकारले जाणार नाही असे पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

पुणे शहरातील ज्या गणेश मंडळांना नव्याने गणेशोत्सव साजरा करायचा असेल किंवा पूर्वीच्या २०१९ मधील परवानगीची जागा प्रकल्प बाधित झाल्याने किंवा अन्य कारणास्तव बदलावी लागली. तर नवीन जागेवरील सर्व परवानगी २०१९ सालच्या प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून नव्याने घ्याव्या लागणार आहेत. उत्सव मंडपाची उंची ही ४० फुटा पेक्षा जास्त नसावी. ४० फुटापेक्षा जास्त उंचीचा मंडप उभारायचा असल्यास त्याकामी मंडळानी सुरक्षितच्या दृष्टिकोनातून अधिकृत स्थापत्य अभियंता यांचे स्टॅबेलिटी सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे.

मंडप व स्वागत कमानी उभारताना आपत्कालीन गाड्या जाण्यासाठी लगतचे रस्ते मोकळे ठेवावेत. गणेश मूर्ती प्राधान्याने प्रामुख्याने पर्यावरण पूरक शाडू मातीच्याच वापराव्यात. राज्यसरकारच्या पर्यावरण विभागाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या प्रदूषण नियंत्रण विषयक कायद्याची आणि मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी. गणेशोत्सव संपल्यानंतर संबंधितांनी तीन दिवसाच्या आत स्व खर्चाने मंडप, रनिंग कमानी ,देखावे, विटांमधील बांधकामे, देखाव्यातील मूर्ती अन्य साहित्य रस्त्यावरून ताबडतोब हटवावे. रस्त्यावरील खड्डे स्व खर्चाने सिमेंट काँक्रीट मध्ये बुजवून जागा सुस्थितीत करावी. ध्वनी प्रदूषणाबाबत शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करावे.

गणेशोत्सव मंडळाने २०१९ साली किंवा नव्याने घेतलेल्या सर्व परवानग्या मंडप किंवा कमानीच्या दर्शनी भागात प्लास्टिक कोटिंग मध्ये लावाव्यात असे आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सोमनाथ बनकर यांनी केले आहे.