October 5, 2024

तोडगा काढा नाही तर मी आंदोलन स्थळी जाईन: शरद पवारांचा सरकारला इशारा

पुणे, २२ आॅगस्ट २०२४: मागील तीन दिवसांपासून पुण्यातील शास्त्री रोड परिसरात एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. राज्यसेवा आणि आयबीपीएस या परीक्षांची तारीख एकच आहे. ही तारीख बदलावी यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू आहे. तीन दिवस झालेत आंदोलन सुरू आहे. मात्र अद्याप त्यांच्या मागणीवर काही विचार झाल्याचे दिसत नाही. आता या आंदोलनात विरोधकही उड्या घेऊ लागले आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनातील विद्यार्थ्यांची भेट घेतली. सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. त्यानंतर आता शरद पवार यांनीही सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.  विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सरकारने उद्यापर्यंत स्पष्ट भूमिका घेतली नाही तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होईल असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

पुण्यात विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा वाढत चालला आहे. आमदार रोहित पवारही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आज संध्याकाळी शरद पवार आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. याआधी त्यांनी राज्य सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. सरकारने लवकर या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु, सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.