July 27, 2024

पुणे: येरवड्यात गुंडांची दहशत; वाहनांची तोडफोड

पुणे, १०/०५/२०२३: येरवडा भागात टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. येरवड्यातील दुहेरी खून प्रकरणातील आरोपींची जामिनावर सुटका झाल्याने प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी तलवारी उगारून परिसरात दहशत माजविल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत शंकर मानू चव्हाण (वय ५५, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चाैघा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवड्यातील पांडू लमाण वस्तीत माजी नगरसेविका श्वेता चव्हाण यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. या परिसरात तक्रारदार शंकर चव्हाण राहायला आहेत. पहाटे आरोपींनी चव्हाण यांची मोटार आणि वाहनांची तोडफोड केली. तलवारी उगारून दहशत माजविली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळक्याला टिपले आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पांडू लमाण वस्तीत दोन टोळ्यांमध्ये वैमनस्य आहे. वैमनस्यातून वाहनांची तोडफोड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शंकर चव्हाण यांच्यावर झालेल्या गोळीबाराच बदला घेण्यासाठी दहा जणांनी सुभाष उर्फ पापा किसन राठोड (वय ४१) आणि अनिल उर्फ पोपट भीमराव वालेकर (वय ३५) यांचा खून केला होता. दुहेरी खून प्रकरणात पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. या प्रकरणात शंकर चव्हाण आणि त्यांच्या मुलाला न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला होता. सुभाष राठोड टोळीतील साथीदारांनी चव्हाण यांची मोटार तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.