June 20, 2024

पुणे: पीएमपीएमएल च्या पर्यटन बससेवेला चांगला प्रतिसाद

पुणे, २१/०५/२०२३: पर्यटन बससेवा क्र. ४ चा दि. २१ मे २०२३ रोजी पुणे स्टेशन स्थानक येथून शुभारंभ पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या पर्यटन बससेवेला हौशी पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून रविवार दि. २१ मे २०२३ रोजी पर्यटन बससेवा क्र. ४ चा शुभारंभ परिवहन महामंडळाचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) श्री. सतिश गव्हाणे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी श्री. चंद्रकांत वरपे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे स्टेशन डेपोचे मॅनेजर श्री. संजय कुसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पीएमपीएमएल च्या पुणे स्टेशन बस स्थानक येथे वातानुकूलित ई-बस ला हिरवा झेंडा दाखवून पर्यटन बससेवा क्र. ४ चा शुभारंभ करण्यात आला.

 

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर पुणे व पिंपरी चिंचवड शहरांनजीकच्या धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता ७ पर्यटन बस मार्ग निश्चित केले असून वातानुकूलीत ई-बसेसव्दारे विशेष ‘पर्यटन बस’ सेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दिनांक ०१/०५/२०२३ पासून सुरू करण्यात आलेली आहे. या ‘पर्यटन बस’ सेवेकरिता प्रति प्रवासी तिकीटदर रूपये ५००/- इतका आकारण्यात येतो.

 

पर्यटन बससेवा क्र. ४ द्वारे हौशी पर्यटकांना खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण या धरणांची सफर करता येते. पीएमपीएमएल ने सुरू केलेल्या पर्यटन बससेवेचे बुकिंग १) डेक्कन जिमखाना, २) पुणे स्टेशन, ३) स्वारगेट, ४) कात्रज, ५) हडपसर गाडीतळ, ६) भोसरी बसस्थानक, ७) निगडी, ८) मनपा भवन या पास केंद्रांवर करता येईल.

 

तरी जास्तीत जास्त पर्यटकांनी पर्यटन बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.