October 5, 2024

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यातील हॉकी दिग्गजांचा सन्मान

पुणे, 28 ऑगस्ट, 2024: राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज पुण्यातील चार हॉकी दिग्गजांना त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सन्मानीत करण्यात आले. या मान्यवरांमध्ये माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि छत्रपती पुरस्कार विजेते रमेश पिल्ले यांच्यासह विजय सरदार, मुनाफ शेख आणि गुरमीत सिंग या माजी राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश होता.

सन्मानीत़चार खेळाडूंपैकी तिघे पुण्यात जन्मलेले असून विजय सरदार हे कोल्हापूरचे आहेत. या सर्वांनी त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. महान हॉकीपटू ध्यानचंद यांच्या 119 व्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात या खेळाडूंना गौरविण्यात आले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, यांनी हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला कार्यक्रम शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, म्हाळुंगे येथे झाला.

आजच्या गौरवमूर्तींमधील सर्वात अनुभवी रमेश पिल्ले यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. खडकी बाजारात जन्मलेल्या रमेश यांच्यातील अंगभूत कौशल्ये ओळखून पालकांसह प्रशिक्षक एम. अँथनी यांनी त्यांना याच खेळात करियर घडविण्यासाठी पाठिंबा दिला. रमेश यांनी हॉकीचे प्राथमिक धडे म्युनिशन फॅक्टरी, खडकी (एएफके) मैदानावर गिरवले.

गेले तिथे छाप पाडलेल्या रमेश यांनी 1985-86 मध्ये मस्टरडॅम येथे झालेल्या चार देशांच्या हॉकी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या कारकिर्दीतील हे मानाचे पान आहे. रमेश यांचा 1978-82 या कालावधीत महाराष्ट्राच्या कनिष्ठ (ज्युनियर) संघात नियमित समावेश होता. 1982 मध्ये झालेल्या ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत ते राखीव खेळाडू होते. त्याच वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या पश्चिम विभागीय निवडचाचणीसाठीही त्यांना बोलावण्यात आले होते.

1987-88 मध्ये ग्वाल्हेर येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण तसेच 1995 मधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या संघांमध्ये रमेश यांचा समावेश होता. 2010 मध्ये झालेल्या वरिष्ठ (सीनियर) राष्ट्रीय स्पर्धेत मुंबईला कांस्यपदक मिळवून देण्यात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. हॉकीतील निवृत्तीनंतर रमेश यांनी प्रीमियर हॉकी लीगमध्ये (पीएचएल) मराठा वॉरियर्स संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. आरसीएफ, मुंबईसाठी (1986-2026) खेळाडू आणि सह-प्रशिक्षक अशी दुहेरी भूमिकाही बजावली. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतरही रमेश हे आरसीएफमध्ये प्रशिक्षकपद भूषवत आहेत.

हॉकी महाराष्ट्रने सुरू केलेल्या सर्व राज्यांसाठीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभही आज झाला. यामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) आणि पुणे महानगरपालिका (पीएमसी) अंतर्गत शाळांमध्ये प्रामुख्याने राबवल्या जाणार्‍या स्काउटिंग कार्यक्रमाचा समावेश आहे. ही योजना राज्यव्यापी विस्तारण्याचा त्यांचा मानस आहे. महाराष्ट्रातील युवा आणि प्रतिभावंत खेळाडूंना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून या माध्यमातून ऑलिम्पिकसाठीचे खेळाडू घडविणे. तसेच आजवरच्या 40 ऑलिम्पियन्सचा वारसा कायम ठेवताना देशाच्या हॉकीमध्ये महाराष्ट्राला पॉवरहाऊस बनविण्याच्या दृष्टीने सक्षम पावले टाकणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या समारंभाला डॉ. राजेश देशमुख, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य (पुणे) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील हॉकीच्या विकासासाठी गुणवत्ता मोहीम राबविण्यासह स्काउटिंग कार्यक्रमाला पाठिंबा दिला. आयपीएस, एडीजी फोर्स वन महाराष्ट्र पोलीस आणि हॉकी महाराष्ट्रचे अध्यक्ष कृष्ण प्रकाश यांनी अध्यक्षपद भूषविले.

प्रमुख पाहुण्यांमध्ये सुधीर मोरे, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य; उदय जोशी, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य; पंकज पाटील, क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त, पीसीएमसी; संजय सबनीस, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य; सुहास पाटील, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य; तसेच अनिता केदारी, क्रीडा अधिकारी, पीसीएमसी यांचा समावेश होता.

विशेष पाहुण्यांमध्ये ऑलिंपियन राहुल सिंग, टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताच्या संघातील सुरेंद्र कुमार, ऑलिम्पियन विक्रम पिल्ले, ऑलिंपियन देविंदर वाल्मिकी, आंतरराष्ट्रीय खेळाडू युवराज वाल्मिकी आणि आकाश चिकटे यांचा समावेश होता.

यंदाचा राष्ट्रीय क्रीडा दिन हा वरील सर्व खेळाडूंनी देशच्या हॉकीसाठी दिलेले अमूल्य योगदान तसेच पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला मिळवून दिलेल्या अभिमानाचा गौरव करणारा ठरला.