पुणे, दि. २४ जुलै – पुणे जिल्हा व मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या तीन जणांची एकाच वेळी पॅरिस ऑलिम्पिकसाठी तांत्रिक अधिकारी-पंच म्हणून निवड झाली असून पुणेकरांची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे.
सीए गिरीश नातू यांची डेप्युटी रेफ्री-२ म्हणून, सुदीप बर्वे यांची पंच-३ म्हणून, तर शैलेश कुलकर्णी यांची पॅरालिम्पिकसाठी पंच म्हणून निवड झाली आहे. पुण्यातील विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी या तिघांचे अभिनंदन केले आहे.
गिरीश नातू यांनी सन २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम पंच म्हणून कामगिरी बजावली होती. ऑलिम्पिकमध्ये हा मान मिळविणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी २०१२- लंडन ऑलिम्पिकमध्ये मॅच को-ऑर्डिनेटर म्हणून कामगिरी बजावली. तसेच बॅडमिंटन एशिया संघटनेच्या रेफरी अॅसेसर कमिटीचे ते अध्यक्ष आहेत.
शैलेश कुलकर्णी यांनी २०२३ मधील वरिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा (कोरिया), आशियाई पॅरालिम्पिक स्पर्धा (चीन),या स्पर्धांमध्ये पंच म्हणून जबाबदारी सांभाळली. सुदीप बर्वे यांनी गेल्या वर्षी चीन येथे झालेल्या सुपर सिरीज अंतिम फेरीत पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच वर्षभरात झालेल्या अन्य सात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी पंच म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांनी २०१९-जागतिक अजिंक्यपद स्पर्धा व २०२२ थॉमस कप स्पर्धेतही पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली.
पीडीएमबीएचे सरचिटणीस सीए रणजीत नातु म्हणाले की, एकाच जिल्ह्यातून ३ तांत्रिकी अधिकारी ऑलिंपिक्सला जाणे ही दुर्मिळ गोष्ट आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. पीडीएमबीए सीए गिरीश नातुंच्या नेतृत्वाखाली गेली ४० वर्षे तांत्रिकी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे वर्ग घेत आहे आणि हे यश त्याचेच फलित आहे.
More Stories
चौथी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धा उद्यापासून
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यातील हॉकी दिग्गजांचा सन्मान
योनेक्स सनराईज ईगल आय सोल्युशन टाइम अटॅक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेस ३ जुलै पासून प्रारंभ