October 5, 2024

पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान

पुणे, १ आॅक्टोबर २०२४: विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून पुणे शहरात तयारी सुरू करण्यात आली असून पंकजा मुंडे आणि मुरलीधर मोहोळ यांनी शहरातील जागांचा प्राथमिक आढावा घेतला आहे. त्यानंतर आता उमेदवार निवडण्यासाठी भाजपचे निरीक्षक प्रत्येक मतदारसंघात जाऊन पदाधिकारी आणि आजी-माजी लोकप्रतिनिधी यांचे गोपनीयरित्या मतदान करून घेणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.

हे मतदान करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे नाव न देता १ ते ३ अशा पसंतीक्रमाने तीन उमेदवारांची नावे लेखी स्वरूपात द्यायची आहेत. खडकवासला, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोन्मेंट मतदारसंघासाठी हे मतदान घेतले जाणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपचे महाराष्ट्राचे निवडणूक निरीक्षक सीटी रवी यांनी आज भाजपच्या शहर कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि मतदारसंघातील आजी माजी लोकप्रतिनिधी यांचा कल जाणून घेण्यासाठी हे मतदान घेतले जाणार आहे. त्यामुळे इच्छूकांकडून पदाधिकाऱ्यांना फोनाफोनी करीत जोरदार लॉबिंग सुरू आहे.

महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या हडपसर आणि वडगाव शेरी मतदारसंघात मात्र ही मतदान प्रक्रिया राबविली जाणार नाही. त्यामुळे हे मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडेच कायम ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मात्र, शिवसेनेकडूनही हडपसर मतदारसंघाची मागणी करण्यात आल्याने या जागांबाबत वादाची शक्यता आहे. भाजपने सहा आणि राष्ट्रवादीने दोन जागा लढविल्यास पुण्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटासाठी एकही जागा असणार नाही. त्यामुळे पक्षाला ताकद देण्यासाठी शिवसेना या मतदारसंघाची आग्रही असल्याची चर्चा आहे.

अशी असेल प्रक्रिया…
या मतदानात पक्षाचे पदाधिकारी, माजी आमदार, नगरसेवक यांच्याकडून त्यांना कोणाला उमेदवारी द्यावी, असे वाटते याबाबत तीन पसंती क्रमांकानुसार नावे घेणार आहे. ही सर्व प्रक्रिया गोपनीय असणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील मतदानाचा हा अहवाल पक्षाला सादर केला जाणार आहे. या प्रक्रियेमुळे उमेदवार निश्चित करताना मतदारसंघातील पदाधिकार्यांचा कल काय हे जाणून घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जाईल.