पुणे, ९ फेब्रुवारी २०२६: पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक सोमवारी बिनविरोध पार पडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी, तर भाजप–रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.
महापालिकेच्या मुख्य सभागृहात सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. पीठासन अधिकारी जितेंद्र डूडी यांनी निवडणुकीचे कामकाज सुरू केले. याआधी भाजप गटनेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, काँग्रेस नेते सुरेश कलमाडी आणि माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांना केली.
महापौर पदासाठी काँग्रेसच्या अश्विनी लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल सावंत आणि भाजपच्या मंजुषा नागपुरे यांचे अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघारीसाठी दिलेल्या वेळेत आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल सावंत यांनी, त्यानंतर काँग्रेसच्या अश्विनी लांडगे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी डूडी यांनी जाहीर केले.
यानंतर उपमहापौर पदासाठीची प्रक्रिया सुरू झाली. काँग्रेसकडून साहिल केदारी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्ता बहिरट आणि भाजप–रिपब्लिकन पक्षाकडून परशुराम वाडेकर यांचे अर्ज वैध ठरले. मात्र, बहिरट आणि केदारी यांनी माघार घेतल्यानंतर परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सभागृहात उपस्थित राहून नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर यांचे अभिनंदन केले.

More Stories
दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील १२८ नागरिक सुखरूप परत
पुणे : रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३५० जणांचे रक्तदान; नववे वार्षिक शिबिर उत्साहात संपन्न
विमाननगरातील रामेश्वरम हॉटेलवर महापालिकेचा हातोडा; ६,५०० चौ. फूट बेकायदा बांधकाम जमीनदोस्त