पुणे, ७ फेब्रुवारी २०२६: शहरातील वाढत्या बेकायदा अतिक्रमणांविरोधात पुणे महापालिकेने धानोरी परिसरात मोठी बुलडोझर कारवाई राबवत अतिक्रमणधारकांना दणका दिला. अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने पत्राशेड स्वरूपातील बांधकामांवर थेट कारवाई करत तब्बल ११,२०० चौरस फूट सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त केली.
ही कारवाई उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच सहाय्यक आयुक्त प्रकाश वालगुडे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. धानोरीतील भारत माता मार्केट परिसरातील ५,१०० चौ.फुट आणि भारत माता रोडवरील फिश मार्केट परिसरातील ६,१०० चौ.फुट क्षेत्रावर उभारलेले बेकायदा पत्राशेड जमीनदोस्त करण्यात आले.
महापालिकेच्या या मोहिमेमुळे रस्ते आणि सार्वजनिक जागा मोकळ्या झाल्या असून वाहतुकीसाठीही दिलासा मिळणार आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनधिकृत स्टॉल, पत्राशेड आणि बाजारपेठांमधील वाढत्या अतिक्रमणांमुळे
-वाहतूक कोंडी वाढत होती
-परिसरात अस्वच्छता निर्माण होत होती
-नागरिकांच्या दैनंदिन हालचालींना अडथळे येत होते
या पार्श्वभूमीवर आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार शहरभर अतिक्रमण हटविण्याची मोहीम अधिक आक्रमक करण्यात आली आहे.
उपायुक्त सोमनाथ बनकर यांनी इशारा देताना स्पष्ट केले की, नोटीस देण्यात आलेल्या नागरिकांनी दिलेल्या मुदतीत अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे. कारवाई रोखण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ अंतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल.
“पुणे शहर स्वच्छ, सुव्यवस्थित आणि नागरिकांसाठी सुसह्य ठेवण्यासाठी पुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहील,” असे बनकर यांनी ठामपणे सांगितले.

More Stories
दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील १२८ नागरिक सुखरूप परत
पुणे : रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३५० जणांचे रक्तदान; नववे वार्षिक शिबिर उत्साहात संपन्न
विमाननगरातील रामेश्वरम हॉटेलवर महापालिकेचा हातोडा; ६,५०० चौ. फूट बेकायदा बांधकाम जमीनदोस्त