पिंपरी-चिंचवड, ३ मे २०२५: चिखली-चऱ्होली परिसरातील नियोजित टाऊन प्लॅनिंग (टीपी) स्कीमला आमदार महेश लांडगे यांनी जोरदार विरोध दर्शवत तात्काळ कार्यवाही स्थगित करण्याची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त व प्रशासक शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनाद्वारे त्यांनी ही मागणी नोंदवली.
या निवेदनात लांडगे यांनी स्पष्ट केलं की, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भूमिपुत्रांना विश्वासात न घेता प्रशासनाने ही योजना पुढे नेणं दुर्दैवी आहे. प्रशासक राजवट पुढे करून जबरदस्तीने स्कीम लादणं हे लोकशाही विरोधी असून, प्रशासनाचा हा मनमानी कारभार मान्य नाही, असंही त्यांनी ठणकावलं. त्यांनी प्रशासनाकडून घेतली जाणारी ही भूमिका खेदजनक असल्याचं नमूद करत, ही कार्यवाही थांबवावी अशी आग्रही मागणी केली.
भाजपच्या सत्ताकाळात गेल्या दहा वर्षांमध्ये पिंपरी-चिंचवडमधील समाविष्ट गावांचा सर्वांगीण विकास झाल्याचा दाखला देत, आमदार लांडगे यांनी सांगितलं की, रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज यांसारख्या मुलभूत सुविधा देण्यासाठी भाजपचे लोकप्रतिनिधी सतत प्रयत्नशील राहिले आहेत. तरीही टीपी स्कीम लागू करताना स्थानिकांना विश्वासात न घेणं म्हणजे त्यांच्या विकास कामांवरच प्रश्नचिन्ह उभं करणारं आहे.
राज्यात भाजपची सत्ता असताना स्थानिक भूमिपुत्रांवर अशी योजना लादली जाणं दुर्दैवी असल्याचं सांगत, जर यामुळे नागरिकांमध्ये शासन आणि लोकप्रतिनिधींविषयी रोष निर्माण झाला, तर त्याला जबाबदार कोण, असा थेट सवालही आमदार लांडगे यांनी उपस्थित केला.
तसेच, ही टीपी स्कीम भूमिपुत्र, लघुउद्योजक आणि स्थानिक नागरिकांसाठी अन्यायकारक असल्याचं म्हणत, २०१७ ते २०२२ दरम्यानही अशाच प्रकारे प्रशासनाने स्कीम लागू करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी विरोध होऊन ती थांबवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा तशीच प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे ही संपूर्ण कार्यवाही तात्काळ स्थगित करण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
More Stories
समाज कल्याण विभागाच्या राजगुरुनगर येथील वसतिगृहात विद्यार्थीनींनी प्रवेश घेण्याचे आवाहन
पुणे: हिंजवडीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजनांवर भर
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळा सज्ज!!