September 17, 2024

पुणे: खासदार संजय राऊत धमकी प्रकरणात पुण्यातून एकजण ताब्यात

पुणे, ०१/०४/२०२३: खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई या कुख्यात टोळीच्या नावाने धमकीचा मेसेज आला होता. याप्रकरणात पुणे गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीस ताब्यात घेऊन, मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. राहुल तळेकर( वय -23 ,रा. वडगाव शेरी, पुणे) असे सदर संशयित इसमाचे नाव असून पुणे पोलिसांनी त्यास पुढील तपास करीता मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी शनिवारी दिली आहे.

खासदार संजय राऊत यांना पंजाब ,हरियाणा मध्ये वर्चस्व असलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याचा धमकीचा मेसेज आलेला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्याचसोबत राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. मुंबई पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे काही धागेदोरे मिळाले होते. त्यानुसार एक संशयित पुण्यात असल्याची माहिती त्यांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेस कळवली होती. त्यानुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने, संबंधित आरोपीचा तपास करत खराडी चंदननगर परिसरातून एका हॉटेल मधून राहुल तळेकर या तरुणास ताब्यात घेतले आहे. तळेकर हा एका हॉटेलमध्ये काम करत आहे. त्याने अशाप्रकारचे कृत्य कशासाठी केले आहे, तसेच त्याचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी नेमका काय संबंध आहे, याबाबतचा तपास पोलीस करत आहे. पुणे पोलिसांनी पुढील तपासासाठी त्याचा ताबा मुंबई पोलिसांना दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.