May 18, 2024

पुणे: दारु पिताना चकना मागितल्याने एकाचा खून, बिबवेवाडीतील खूनाचा उलगडा; दोन आरोपी अटकेत

पुणे, १६/०७/२०२३: बिबवेवाडी भागातील सरगम चाळीच्या आवारात खून प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला. दारु पिताना चकना मागितल्याने दोघांनी एकाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दोन जणांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली असून, खून झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

केतन शाम टेमकर (वय १९), ओंकार लक्ष्मण सणस (वय २२, दोघे रा. राजीव गांधीनगर, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बिबवेवाडी भागातील सरगम चाळ परिसरातील मोकळ्या जागेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. बिबवेवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक संजय आदलिंग बिबवेवाडी भागात गस्त घालत होते. त्या वेळी टेमकर आणि सणस यांनी एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती खबऱ्याने दिली.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने टेमकर आणि सणसला पकडले. चौकशीत दोघांनी सरगम चाळीच्या परिसरात एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली. दारु पिताना एका अनोळखी व्यक्तीने चकना मागितला होता. चकना न दिल्याने वादावादी झाली. त्यानंतर चकना मागणाऱ्या व्यक्तीला मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड घातला, असे टेमकर, सणस यांनी पोलिसांना सांगितले.

पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त शाहूराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय पतंगे, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, संजय आदलिंग, शैलेश आलाटे, संतोष जाधव, सतीश मोरे, शिवाजी येवले, तानाजी सागर यांनी ही कारवाई केली.