July 8, 2025

पुणे: पुण्यात दाखल झाली संत तुकाराम महाराजांची पालखी; विठुनामाच्या गजरात वारकऱ्यांचे स्वागत

पुणे, २० जून २०२५: ‘ज्ञानोबा माऊली – तुकाराम’ या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या असून आज पुण्यात त्यांचे आगमन झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे शहरात दाखल झाली. पालखीबरोबर मोठ्या संख्येने वारकरी शहरात दाखल झाले असून, शहराच्या विविध भागांत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे.

पुण्यातील भवानी पेठ भागात उद्या पालखीचा मुक्काम असणार आहे. या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असणार असल्याने शहरात भक्तिरसाने भारलेले वातावरण पाहायला मिळत आहे.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकर नागरिक, विविध गणेश मंडळे, सामाजिक संस्था आणि स्थानिक प्रशासन यांच्या वतीने आरोग्य, निवास, अन्न, पाणी आणि स्वच्छतेच्या विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुणेकरांनीही मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभाग घेत वारकऱ्यांसाठी सेवाकार्य हाती घेतले आहे.

शहरात ठिकठिकाणी दिंड्यांचे स्वागत फलक, फुलांनी सजवलेले स्वागत कक्ष, आणि भजन-कीर्तनाचे कार्यक्रम सुरू असून, पुणे शहर सध्या विठ्ठलनामात रंगून गेले आहे.