July 8, 2025

पुणे ग्रामीण पोलिसांकडून ‘हरित वारी’ उपक्रमांतर्गत १०,००० वृक्ष लागवड; पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

पुणे, १९ जून २०२५ : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘हरित वारी’ आणि ‘१ कोटी वृक्ष लागवड’ उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलिस दलाने १०,००० झाडांची वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. पर्यावरण संवर्धन व वारीच्या पारंपरिक श्रद्धेला हरिततेची जोड देण्यासाठी या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

या उपक्रमाचा प्रारंभ १७ जून २०२५ रोजी बार्हाणपूर, बारामती उपमुख्यालय येथे करण्यात आला. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि अपर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) गणेश बिरादार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या उपक्रमासाठी वडगाव मावळ, बारामती, सासवड व पौड येथील वनविभागाने आणि जिल्हा परिक्षेत्रीय वन अधिकारी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पुणे ग्रामीण पोलिस दलाला एकूण १०,००० रोपं उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

पुणे ग्रामीणमधील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये, तसेच पुणे आणि बारामती उपमुख्यालयांमध्ये प्रत्येकी २०० झाडे लावण्यात येणार असून, त्यांचे पालन-पोषण स्थानिक पोलीस अधिकारी आणि अंमलदार स्वतः करणार आहेत.

हा उपक्रम केवळ झाडे लावण्यापुरता मर्यादित नसून, वृक्षांचे रक्षण, वाढ व संवर्धन, तसेच वृक्षतोडीमुळे होणाऱ्या पर्यावरणीय ऱ्हासास प्रतिबंध घालणे हेही महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

पुणे ग्रामीण पोलिस दल, जिल्हा वन विभाग, आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने पर्यावरणपूरक संदेश देत भावी पिढीसाठी हरित वारसा तयार करण्यासाठी कटीबद्ध आहे. ‘हरित वारी’ हा उपक्रम केवळ एक सामाजिक बांधिलकी नसून पर्यावरणाच्या रक्षणासाठी पोलीस यंत्रणेकडून घेतलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.