May 2, 2024

पुणे: पर्वतीत कोयता हवेत फिरवून नागरिकांमध्ये केली दहशत, टोळक्याविरुद्ध परस्परविरोधी गुन्हा दाखल

पुणे, दि. २४/०७/२०२३: कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा पर्वती परिसरात दिसून आली आहे. बहिणीची छेड काढल्याच्या रागातून टोळक्याने एकावर वार करुन हवेत कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे परिसरातील नाररिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना २२ जुलैला रात्री अकराच्या सुमारास दांडेकर पुल परिसरात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रेयस खंदारे (वय १६, रा. पानमळा सिंहगड रस्ता) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी अभिजीत पाटील, संकेत लोंढे, प्रमोद कळंबे, बिट्या कांबळे, अनंता खोले, आज्या उर्फ अजित, शुभम गजधने अब्दुल अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस आणि त्याचा मित्र सुभाष चलवादी, सुहास शेरखाने दांडेकर परिसरात शतपावली करीत होते. त्यावेळी साथीदारांसह आलेल्या अभिजीतने बहिणीची छेडछाड केल्याचा जाब श्रेयस आणि आदित्यला विचारला. त्यानंतर त्यांना मारहाण करीत शर्टामध्ये लपविलेला कोयता काढून श्रेयसवर वार केला. त्यानंतर परिसरातील वस्तीमध्ये येउन कोयता हवेत फिरवून, जर कोणी पोलिसात तक्रार दिली तर एकएकेचा खून करेल, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने वैभव मोरे याच्या घरात शिरुन त्याच्या आईला शिवीगाळ केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वाय बी पाटील तपास करीत आहेत.

टीव्हीचा रिजार्च करण्यासाठी दुकानात गेलेल्या तरूणीावर वार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १९ जुलैला जनता वसाहतीत घडली आहे. याप्रकरणी नव्या वाडकर, वैभव मोरे, यश वाघमारे, सम्या कारंडे, गोट्या खंदारे यांच्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीची बहीण टीव्हीचा रिचार्ज करण्यासाठी दुकानात गेली होती. त्यावेळी नव्या वाडकरने तिच्यावर कोयता फेकून मारला. मात्र, तिने तो हुकवला असता, आरोपी वैभव मोरेने तिच्यावर कोयता फेकून मारुन खुनी हल्ल्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उपनिरीक्षक एस.टी. जगदाळे तपास करीत आहेत. दोन्ही प्रकरणात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.