May 2, 2024

पुणे: एसीपीने गोळ्या झाडून पत्नी आणि पुतण्याचा केला खून , स्वतः वरही गोळ्या झाडून केली आत्महत्या

पुणे, दि. २४/०७/२०२३: बाणेर परिसरात राहणार्‍या अमरावती पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्ताने (एसीपी) पिस्तूलातून गोळ्या झाडून पत्नी आणि पुतण्याचा खून केल्याची घटना सोमवारी घडली आहे. त्यानंतरही त्यांनी स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी दोघांची हत्या का केली. त्यानंतर स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या कशामुळे केली, याचे कारण स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत तपासाला गती देण्यात आली आहे.

“स्वतःच्या पत्नीसह पुतण्यावर गोळ्या झाडून सहायक पोलीस आयुक्तपदी कार्यरत असलेल्या अधिकार्‍याने आत्महत्या केली आहे. त्यांनी दोघांचे खून करीत स्वतः आत्महत्या का केली, याप्रकरणी तपास करण्यात येत आहे.” – अंकुश चिंतामण, पोलीस निरीक्षक, चतुःशृंगी पोलीस ठाणे

मोनी गायकवाड (पत्नी, वय ४४), दीपक गायकवाड ( पुतण्या, वय ३४) अशी खून केलेल्यांची नावे आहेत. भारत गायकवाड असे आत्महत्या केलेल्या एसीपींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत गायकवाड हे मुंबईत वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कार्यरत होते. पदोन्नती झाल्यानंतर त्यांना अमरावतीत पोलीस आयुक्तालयातील राजपेठ विभागात सहायक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांचे कुटूंबिय पुण्यातील बाणेरमधील हायस्ट्रीट परिसरातील इमारतीत राहायला होते. शनिवारी (दि. २२) सुट्टी असल्याने ते पुण्यातील बाणेरमधील घरी आले होते. त्याठिकाणी त्यांची पत्नी, दोन मुले आणि पुतण्या राहायला होते. रविवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास भारत यांनी पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यामुळे आवाजाने घरातील कुंटूबिय जागे झाले.

काही वेळानंतर भारती यांनी स्वत:वर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणाची भारत यांच्या मुलाने पोलीस नियत्रंण कक्षाला माहिती दिली. त्यानुसार माहिती मिळाल्यानंतर चतुःशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी फ्लॅटमध्ये तिन्हीही मृतदेह आढळून आले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी गायकवाड यांच्याकडे असलेले पिस्तूल जप्त केले आहे. त्यांनी खासगी वापरासाठी हे पिस्तूल घेतले होते. त्यांच्याकडे शस्त्र परवाना असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याचा खून का केला ? याबाबतची माहिती मिळू शकली नाही. चतु:शृंगी पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.