May 11, 2024

पुणे: ड्रायव्हर्स डे निमित्त पीएमपीएमएल च्या ड्रायव्हर सेवकांचा सन्मान

पुणे, ३०/०१/२०२४: ड्रायव्हर्स डे निमित्त उत्कृष्ट सेवा देणाऱ्या पीएमपीएमएल च्या ड्रायव्हर सेवकांचा सन्मान पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. संजय कोलते यांचे हस्ते व सहव्यवस्थापकीय संचालक मा. श्री. नितीन नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य प्रशासकीय इमारतीत असणाऱ्या ट्रेनिंग हॉलमध्ये दि. २४ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आला.

विना अपघात सेवा देणाऱ्या १५ ड्रायव्हर सेवकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. १५ डेपोतून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण १५ ड्रायव्हर सेवकांची निवड यासाठी करण्यात आली होती. तसेच असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्ज (ए.एस.आर.टी.यु.) या संस्थेने मागील वर्षी दिल्ली येथे बोलावून ज्यांचा यथोचित सन्मान केला ते २२ वर्षे विना अपघात सेवा देणारे स्वारगेट डेपोतील ड्रायव्हर श्री. अरूण कुचेकर यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

“पीएमपीएमएल च्या माध्यमातून जी प्रवाशी वाहतूक सेवा दिली जाते त्यामध्ये ड्रायव्हर सेवक अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडत असतात. १५ डेपोतून प्रत्येकी १ याप्रमाणे १५ उत्कृष्ट सेवा देणाऱ्या ज्या ड्रायव्हर सेवकांचा सत्कार करण्यात आला ते अभिनंदनास पात्र आहेत. त्यांच्या कामातून इतर ड्रायव्हर सेवकांनी प्रेरणा घ्यावी.”
— डॉ. संजय कोलते, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल.

“वाहतूक कोंडीतून सुरक्षितपणे बस चालवून प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचविण्याचे महत्वाचे काम पीएमपीएमएलचे ड्रायव्हर सेवक करतात. पीएमपीएमएलच्या ड्रायव्हर व कंडक्टर सेवकांवरच पीएमपीएमएल ची प्रतिमा अवलंबून असते. सेवकांच्या सेवाभावी वृत्तीमुळेच पीएमपीएमएलच्या नावलौकिकात भर पडत असते.” — नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल.