July 24, 2024

पुणे: ८० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदानांची सुविधा उपलब्ध

पुणे, १५ फेब्रुवारी २०२३: २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूकीकरीता टपाली मतदानासाठी नोंदणी केलेल्या ८० वर्षावरील वय असलेले २९९ ज्येष्ठ नागरिक व ४ दिव्यांग मतदारांना टपाली मतदान स्वरुपात म्हणजे प्रत्यक्ष घरी राहून मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

पोटनिवडणुकीसाठी नमुना १२ ड भरुन दिलेल्या ८० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान स्वरुपात म्हणजे प्रत्यक्ष घरी राहून मतदान करता येण्याबाबत सुविधा आहे. मतदान अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी पाठवून त्यांचे मत नोंदवून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी केली असून १६ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत कार्यवाही करण्यात येणार आहे.

मतदारांच्या प्रत्यक्ष घरी जावून त्यांचे मतदान घेण्यासाठी एकूण ८ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकामध्ये पथकप्रमुख तथा मतदान अधिकारी क्र. १ म्हणून सेक्टर ऑफीसर, मतदान अधिकारी क्र. २ म्हणून महसूल कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. या कामकाजावर निरीक्षण ठेवण्यासाठी सूक्ष्म निरीक्षक, या प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यासाठी छायाचित्रकार व पोलीस कर्मचारी यांचा पथकामध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली आहे.