April 28, 2024

पुणे: संवेदनशील ठिकाणांची ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरणाची तयारी, दहशतवाद्यांची एनआयएकडून चौकशी

पुणे, २२/०७/२०२३: शहरात घातपाती कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या दोन दहशतवाद्यांकडून पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्यांचे साहित्य जप्त केले आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणांची ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करण्याची तयारीत दहशतवादी असल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) असून, याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.

कोथरुड भागात पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांचा दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून स्फोट करण्याचा डाव होता, असे ‘एनआयए‘च्या तपासात आढळून आले आहे. या दहशतवाद्यांचा पुण्यात कोठे वावर होता, याची माहिती घेण्यात येत असून, त्यांच्याबरोबर असलेल्या पसार साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. कोथरुड भागातून दुचाकी चोरण्याच्या तयारीत मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय २४), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय २३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) होते. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडले. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद शहनवाज आलम (वय ३१) पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

इम्रान खान, युनूस साकी यांच्याकडून बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळ्या, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकिट, इलेक्ट्राॅनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुण्यात लष्कराचे दक्षिण मुख्यालय आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसह महत्वाच्या लष्करी, तसेच संशोधन संस्था आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्याच्या तयारीत दहशतवादी असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यादृष्टीने त्यांची चाैकशी करण्यात येत आहे. खान आणि साकी यांच्याकडून पांढऱ्या रंगाच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या असून , गोळ्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. गेल्या दीड वर्षांपासून दहशतवादी कोंढवा भागात वास्तव्यास होते. घरमालकाने त्यांच्या भाडेकराराची नोंदणी केली नसल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

पोलिसांनी घरझडतीत एक काडतूस जप्त केले असून, पिस्तूल सापडले नाही. साकी आणि खान आयसीस या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’शी संबधित असून, ते जयपूर येथे बाँबस्फोट घडविण्याच्या तयारीत होते. स्फोटके बाळगल्याप्रकरणी एनआयएने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ते पसार झाले होते.