April 27, 2024

पुणे: वाहतूक शाखेतील सहायक फाैजदाराची दारुच्या नशेत पैशांची मागणी, सहायक निरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश

पुणे, २२/०७/२०२३: वाहतूक शाखेतील एका सहायक फाैजदाराने कर्तव्यावर असताना दारुच्या नशेत वाहनचालकांना शिवीगाळ करुन दंडाच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन सहायक पोलीस फौजदाराला निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले.

प्रेमचंद भानूदास वेदपाठक असे निलंबित करण्यात आलेल्या सहायक फाैजदाराचे नाव आहे. वेदपाठक शिवाजीनगर वाहतूक विभागात सहायक फौजदार आहेत. माॅडेल काॅलनी परिसरात ते वाहतूक नियमन करत हाेते. कर्तव्यावर असताना त्यांनी दारु प्याली होती. दंडाच्या नावाखाली त्यांनी वाहनचालकांकडे पैशांची मागणी केली होती. नागरिकांनी या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मोबाइलद्वारे चित्रीकरण केले. एका महिलेने याबाबत शिवाजीनगर वाहतूक विभागात लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी वेदपाठक यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. वेदपाठक यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेऊन त्यांना निलंबित करण्यात आले आहे.