July 24, 2024

पुणे: मसाज सेंटरमध्ये परदेशी महिलांना नोकरी देऊन वेश्याव्यवसाय, विशेष शाखेकडून मसाज सेंटरच्या मालकासह तिघांच्या विरुद्ध गुन्हा

पुणे, २६/०३/२०२३: कोंढव्यातील एका मसाज सेंटरमध्ये परदेशी महिलांना नोकरीस ठेवून व्हिसा कागदपत्रांची पूर्तता न केल्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून मसाज सेंटरचा मालक, व्यवस्थापकासह जागा मालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

कोंढव्यातील एका मसाज सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या कारवाईत पोलिसांनी चार परदेशी महिलांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्या चार महिला मूळच्या थायलंडच्या असून त्या नोकरी करण्याचा व्हिसा नसताना मसाज सेंटरमध्ये काम करत असल्याचे चौकशीत उघडकीस आले होते. ताब्यात घेण्यात आलेल्या चार महिलांना मुंढव्यातील शासकीय महिला सुधारगृहात ठेवण्यात आले. चार महिलांना लवकरच मायदेशी पाठविण्यात येणार असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले.

परकीय नागरिक नोंदणी विभागाच्या नियमावलीनुसार परदेशी व्यक्तीने नोकरी करण्यासाठी व्हिसासंदर्भातील आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. मसाज सेंटरचा मालक, व्यवस्थापक, व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्या मालकाने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाा असल्याचे पोलीस उपायुक्त राजा यांनी नमूद केले.