July 27, 2024

पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालयातील निरीक्षकाला मारहाण

पुणे, ११/०३/२०२३: प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) कामानिमित्त गेलेल्या नागरिकांची कामे दलालांशिवाय मार्गी लागत नाहीत, असा सामान्यांचा अनुभव आहे. आरटीओ कार्यालयात दलालांचा (एजंट) सुळसुळाट झाला असून एका दलालाने वाहनाची कागदपत्रे आरटीओ निरीक्षकाच्या अंगावर फेकून मारहाण केल्याची घटना विश्रांतवाडी भागातील फुलेनगर आरटीओ कार्यालयात घडली.

याबाबत मोटार वाहन निरीक्षक अभिजित गायकवाड (वय ३५) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी निकी फ्रान्सीस स्वामीनाथन (वय ३८, रा. आदर्श इंदिरानगर, आळंदी रस्ता, फुलेनगर) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन निरीक्षक अभिजीत गायकवाड फुलेनगर येथील कार्यालयात होते. त्या वेळी दलाल स्वामीनाथन गायकवाड यांच्या कार्यालयात आला आणि ‘ए गायकवाड, या कागदपत्रांवर सही करुन दे’, असे सांगून शिवीगाळ केली. ‘गायकवाड सही कर नाही तर घरी येऊन जीवे मारुन टाकीन’,अशी धमकी देऊन त्याने गायकवाड यांना मारहाण केली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी स्वामीनाथने अरेरावी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करुन सगळ्यांना अडकवेल, अशी धमकी देऊन स्वामीनाथन पसार झाला.
गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. शासकीय कामात अडथळा तसेच धमकावल्या प्रकरणी दलाल स्वामीनाथन याला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.